उपराजधानीला दिलासा, दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 12:30 AM2021-05-09T00:30:51+5:302021-05-09T00:32:00+5:30
Oxygen Express reached कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असली तरी ऑक्सिजनची मागणी कायम आहे. शनिवारी पहाटे दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात पोहोचल्यामुळे ५६.३ मेट्रिक टन ऑक्सिजन नागपूरला मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असली तरी ऑक्सिजनची मागणी कायम आहे. शनिवारी पहाटे दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपुरात पोहोचल्यामुळे ५६.३ मेट्रिक टन ऑक्सिजन नागपूरला मिळाला आहे.महाराष्ट्रात ऑक्सिजन घेऊन पोहोचलेली ही तिसरी रेल्वेगाडी असून नागपुरात पोहोचलेली दुसरी रेल्वेगाडी आहे. यापूर्वी विशाखापट्टनम येथून २३ एप्रिल रोजी पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस ७ टँकर ऑक्सिजन घेऊन पोहोचली होती. त्यातील ३ टँकर नागपूरला तर उर्वरित ४ टँकर नाशिकला मिळाले होते. दुसरी रेल्वेगाडी ओडिशाच्या अंगूल येथून ऑक्सिजन घेऊन आली आहे. शनिवारी पहाटे ४.०५ वाजता ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ८ वर पोहोचली. रँम्पच्या मदतीने चारही टँकर उतरवून घेण्यात आले. चार टँकर मिळून एकूण ५६.३ मेट्रिक टन ऑक्सिजन नागपूरला मिळाला असून त्याचे वितरण जिल्हा प्रशासनामार्फत होणार आहे. दरम्यान रविवारी पहाटे आणखी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.