अजनी रेल्वे स्थानकाची कमान महिलांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 09:27 PM2018-03-08T21:27:44+5:302018-03-08T21:28:05+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माटुंगा,जयपूरच्या गांधीनगर या स्थानकानंतर नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकाची चावी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरी यांच्या हाती सोपविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी स्थानकावर नियुक्ती झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनीही उत्साहात आपल्या पदाचा पदभार स्वीकारून नवे आव्हान यशस्वीरीत्या पेलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
जागतिक महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अजनी रेल्वे स्थानकावर एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, राजभाषा अधिकारी पूर्णिमा सुरडकर, मुख्य आरोग्य अधीक्षक डॉ. व्ही. के. आसुदानी, वरिष्ठ विभागीय आरोग्य अधिकारी अरुंधती देशमुख, वरिष्ठ विभागीय अभियंता पवन कुमार पाटील, विभागीय कार्मिक अधिकारी डॉ. पुलकेश कुमार, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता महेश कुमार, महिला-बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, नगरसेविका विशाखा मोहोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र म्हणाले,जागतिक महिला दिनानिमित्त अजनी स्थानकाची जबाबदारी पूर्णपणे महिलांच्या हाती सोपविण्यात आली असून, आजपासून स्टेशनचा संपूर्ण कारभार महिलाच हाताळणार आहेत. अजनी स्थानकाची जबाबदारी निष्ठेने पार पाडून स्थानकाला आदर्श स्थानक बनविण्यात महिला यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी वरिष्ठ विभागीय आरोग्य अधिकारी अरुंधती देशमुख, राजभाषा अधिकारी पूर्णिमा सुरडकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. संचालन वाणिज्य निरीक्षक उमा कृष्णमूर्ती यांनी केले. आभार एस. जी. राव यांनी मानले.
महिला कर्मचारी निष्ठेने कार्य करतील : ‘डीआरएम’
अजनी स्थानकावर आयोजित समारंभात बोलताना ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता म्हणाले, अजनी हे महत्त्वाचे स्थानक आहे. पुढे या स्थानकाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. येथे मल्टीमॉडेल इंटिग्रेटेड हब तयार होणार आहे. महिला कर्मचाºयांपुढे हे एक आव्हान असून, या आव्हानाचा सामना करण्यासाठी महिला सक्षम आहेत. त्या निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडू : माधुरी चौधरी
अजनी स्थानकाच्या नवनियुक्त स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरी यांनी उत्साहाने अजनी रेल्वेस्थानकाची जबाबदारी स्वीकारली. त्या म्हणाल्या, ‘आजपर्यंत जे काम पुरुषांच्या सोबतीने करत होते, ते काम आजपासून महिलांना सोबत घेऊन करावे लागणार आहे. त्यासाठी आम्ही सर्व महिला सक्षम आहोत. येथे महिलांसोबत काम करण्याचा आनंद अनुभवण्यासोबतच आम्ही निष्ठापूर्वक आमच्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहोत.’
सुरक्षेच्या मुद्याकडे दुर्लक्ष
अजनी स्थानकाचा कार्यभार महिलांच्या हाती सोपविण्यात आला असला तरी येथे सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथे रेल्वे सुरक्षा दलासाठी चौकीची व्यवस्था नाही. सुरक्षेबाबत बोलताना सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या झोनल कार्यकारिणीचे कार्यकारी अध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य म्हणाले, अजनी स्थानकाचा पदभार महिलांना सोपविण्यासोबतच त्यांना सुरक्षा पुरविणे गरजेचे आहे. येथील मंजूर असलेल्या सर्व रिक्त जागा भरल्यास महिलांच्या हाती स्टेशन सोपविण्याचा प्रयोग यशस्वी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यांना सोपविली अजनी स्थानकाची जबाबदारी
अजनी स्थानकाच्या व्यवस्थापक म्हणून माधुरी चौधरी कमान सांभाळणार आहेत. याशिवाय मुख्य वाणिज्य लिपीक म्हणून कीर्ती अवसरे, सारिका सेलुकर, सुनीता गौरकर, मंजू पाल, प्रीती डोंगरे, इंदिरा सिरपूरकर, सोनाली शेटे, तिकीट तपासणी कर्मचारी म्हणून माला हुमणे, स्वाती मालवीय, प्रीती मोगरे, लगेज पार्सल पोर्टर म्हणून पायल दादुरे, प्रीती नायक, श्वेता शेंद्रे, सुनंदा धार्मिक, सफाई कर्मचाºयात आशा रामकृष्ण, जयशीला राजेंद्र, विमल मोगरे, शीला नंदकिशोर, स्टेला जोसफ, लक्ष्मी वामनराव, कमला जगजीवन, कमला सदाराम, मालती प्रदीप यांचा समावेश आहे.
सॅनिटरी नॅपकिन डिस्पेंसिंग मशीनचे उद्घाटन
समारंभात महिला समाज सेवा समितीच्या सौजन्याने अजनी रेल्वेस्थानकावरील सॅनिटरी नॅपकिन डिस्पेंसिंग मशीनचे उद्घाटन महिला सफाई कर्मचारी शीला नंदकिशोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला समाज सेवा समितीच्या अध्यक्ष ममता गुप्ता, उपाध्यक्ष दिया कोठारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
इतवारी स्थानकाची धुरा महिलांकडे
जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी रेल्वेस्थानकाची धुराही महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आली. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. रथ, वाय. एच. राठोड, महिला समाज सेवा समितीच्या अध्यक्ष विधी अग्रवाल, विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. इतवारी स्थानकावर बुकिंग आॅफीस, आरक्षण कार्यालय, पार्सल आॅफिस, तिकीट तपासणी कर्मचारी, चौकशी विभाग, यांत्रिक, सिग्नल अँड टेलिकॉम, सुरक्षा, इलेक्ट्रिकल, सफाई आदींचे काम ४२ महिलांनी सांभाळले.