१८ उपकेंद्रांमध्ये लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:06 AM2021-03-29T04:06:37+5:302021-03-29T04:06:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : तालुक्यात काेराेनाच्या वाढत्या संक्रमणामुळे काेराेना लसीकरणाला वेग मिळाला आहे. राेज किमान २५० नागरिकांच्या लसीकरणाचे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : तालुक्यात काेराेनाच्या वाढत्या संक्रमणामुळे काेराेना लसीकरणाला वेग मिळाला आहे. राेज किमान २५० नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ते पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या एकूण १८ उपकेंद्रांमध्ये या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. तालुक्यात शनिवारपर्यंत एकूण ६११ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी दिली.
काटाेल तालुक्यातील ज्या प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या हद्दीत काेराेना संक्रमण आहे, ती उपकेंद्रे व गावे वगळता मेंढेपठार (बाजार), घरतवाडा, रिधोरा, पारडसिंगा, मासोद, पुसागोंदी, मेंडकी, येरला (धोटे), मूर्ती, इसापूर, वंडली, डोरली, दिग्रस, पांजरा (काटे), बोरडोह, झिलपा, खुर्सापार व मसाळा या १८ उपकेंद्रांमध्ये काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आले आहे. शनिवारी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३५, येनवा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत ६३, कचारी सावंगा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत १४ तसेच मूर्ती उपकेंद्रांतर्गत ५१, मासोद उपकेंद्रांतर्गत ६६, पारडसिंगा उपकेंद्रांतर्गत ९९, पांजरा (काटे) उपकेंद्रांतर्गत २३, रिधोरा उपकेंद्रांतर्गत ३७, ढवळापूर उपकेंद्रांतर्गत ७५, डोरली उपकेंद्रांतर्गत ७५ आणि काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात ७३ अशा एकूण ६११ ज्येष्ठ नागरिकांना काेराेना लस देण्यात आली आहे.
प्रत्येक उपकेंद्रावर राेज किमान २५० नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी आराेग्य विभागाचे कर्मचारी प्रयत्नरत असून, तसे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना २५० नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे कठीण जात आहे. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी तसेच स्वत:साेबतच इतरांची काळजी घेण्यासाठी सर्वांनी या लसीकरण माेहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी केले आहे.
...
अन्यथा कारवाई करू
काेराेना संक्रमितांनी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार विलगीकरणात राहणे अनिवार्य आहे. काही काेराेनाबाधित व्यक्ती बाहेर मुक्त संचार करीत असल्याचे आढळून आले असून, ते काेराेना संक्रमणास हातभार लावत आहेत. हा अपराध असल्याने त्यांनी विलगीकरण कक्षाबाहेर पडू नये. तसे आढळून आल्यास त्यांना ग्रामसेवकांमार्फत नाेटीस बजावण्यात येणार असून, कायद्यानुसार पाेलीस कारवाई केली जाईल, असेही खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी स्पष्ट केले.