व्यावसायिक सिनेमा चोरून गुंगीचे औषध दिल्यासारखा; मोहन आगाशे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:34 AM2018-07-23T11:34:45+5:302018-07-23T11:35:14+5:30
व्यावसायिक सिनेमा चोरून गुंगीचे औषध दिल्यासारखा झाला आहे, असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिनेमा संपल्यानंतर त्यातला विषय डोक्यातून जात नाही. तो विचार अस्वस्थ करतो, कुणाला तरी बोलावस वाटते, तोच चांगला सिनेमा. दुर्दैवाने गल्लाभरू सिनेमाला महत्त्व देणारे व्यावसायिक वितरक असे चांगले चित्रपट स्वीकारत नाही. लोकांना आवडणार नाही हेही तेच ठरवतात. अशा गल्लाभरू चित्रपटांमधून चुकीची माहिती लोकांपर्यंत जाते. कुठलाही मानसिक आघात झाला की स्मृती जाते, अशी गैरसमज पसरविणारी माहिती मोठे स्टार असलेल्या कमर्शियल चित्रपटांंमधून समाजात रुजविली गेली आहेत. याच वृत्तीमुळे डोक घरी ठेवून केवळ करमणूक म्हणून सिनेमाला जाण्याला महत्त्व आले आहे. व्यावसायिक सिनेमा चोरून गुंगीचे औषध दिल्यासारखा झाला आहे, असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय मेंदूदिनानिमित्त इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरालॉजी, नागपूर न्यूरो सोसायटी, सायकॅट्रिक सोसायटी व आॅरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनच्यावतीने ‘अस्तु’ या मराठी चित्रपटाचा खास शो व डॉ. मोहन आगाशे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम कविकुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टीम येथे आयोजित करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘अस्तु’ चित्रपटासह विविध विषयांवर मत व्यक्त केले. शिक्षण हे ज्ञानासाठी असते हेच आपण विसरत चाललो आहोत. त्याऐवजी मार्क्स आणि पदवी मिळविणे महत्त्वाचे झाले आहे. जगाच्या पाठीवर कोणतेही ज्ञान अनुभवातून येते. डिजिटल क्रांतीमुळे समाज व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाची भाषा ही व्यवसायासाठी झाली आहे. कुणी आपल्याला गंडवू नये म्हणून नाईलाजाने ही भाषा शिकणे प्रत्येकासाठी आवश्यक झाले. आजची शिक्षण व्यवस्था अक्षर लिहायला, वाचायला शिकवते. पण एखाद्या बाबीकडे पाहण्याची दृष्टी, विचार करण्याची प्रगल्भता देत नाही. डोळे, कान, नाक, त्वचा, मन, बुद्धी ही संवेदनेची सेंसर्स त्यामुळे बधीर होत आहेत.
भावना, सेवा देखील सामाजिक झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या घरात डोकावून पाहण्यासाठी कुणालाच वेळ नाही. त्यामध्ये सिनेमाही कलुषित झाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृहात मानसिक ताण सोडून जाणाऱ्याचे प्रमाण अगणित आहे. मानवी भावना समृद्ध करणारा सिनेमा दुर्मिळ होतोय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर डॉ. सुधीर भावे यांनी डॉ. मोहन आगाशे यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट व कल्चरल फाऊंडेशनचे संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
अस्तु हा सिनेमा अल्झाईमर (स्मृतिभ्रंश) या आजाराबाबतचे सत्य मांडणारा आहे. यात नात्यांची गुंतागुंत व ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन यावरही विचार होतो. कोणत्याही आजारात काळजी व सेवा महत्त्वाची असते, हा केंद्रबिंदू यात आहे. चित्रपट तयार करण्यासाठी स्वत:चा पीएफचा पैसा यात गुंतविला. मात्र कमर्शियल नसल्याने वितरक हा सिनेमा स्वीकारायला तयार नव्हते. त्यामुळे अभ्यासपूर्ण मांडलेला हा विषय समाजापर्यंत पोहचावा, यासाठी विशेष शोचे आयोजन करून तो पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले.
सध्या मार्केटींगला महत्त्व आले आहे. यामुळे हा आजार, त्यामुळे तो आजार होतो असे सांगून जगण्याचेही मार्के टींग व मृत्यूची भीती दाखविली जाते आहे. योग्य वेळी व आनंदाने मरणासाठी आनंदाने जगणे आवश्यक आहे. ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे आणि हेच सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.