नागपुरातील मोक्षधाम घाटाच्या वाहन पार्किंगमध्ये व्यावसायिक वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:03 AM2019-07-03T00:03:00+5:302019-07-03T00:05:05+5:30
मोक्षधाम घाटाच्या पार्किंगमध्ये व्यावसायिक वाहने लागत असल्याने, अंत्ययात्रेत येणाऱ्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागाच राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. घाटावरील मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोक्षधाम घाटाच्या पार्किंगमध्ये व्यावसायिक वाहने लागत असल्याने, अंत्ययात्रेत येणाऱ्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागाच राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. घाटावरील मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे.
मोक्षधाम घाटाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या संख्येने व्यावसायिक वाहनांचे पार्किंग असते. यात मालवाहू वाहने, ऑटोडीलवाल्यांची वाहनेसुद्धा रस्त्यावर असतात. मोक्षधाम घाटाच्या समोर वाहनांची रांगच लागलेली असते. अंत्ययात्रा घेऊन मोक्षधाम घाटावर येणाऱ्याच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. परंतु या पार्किंगच्या जागेवर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे पार्किंग करण्यात येते. मोठ्या संख्येने वाहने पार्किंगमध्ये उभी असतात. त्याचबरोबर ऑटोडील वाल्यांचे विक्रीला असलेले वाहन सुद्धा घाटाच्या पार्किंगमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे घाटावर अंत्ययात्रा घेऊन येणाऱ्यांच्या चारचाकी वाहनांसाठी जागाच राहत नाही. मंगळवारी दुपारच्या सुमारास लोकमतच्या टीमने घाटाच्या पार्किंगचे अवलोकन केले. घाटावर एकही अंत्ययात्रा आलेली नव्हती. तरी सुद्धा घाटाच्या पार्किंगमध्ये मोठ्या संख्येने चारचाकी वाहने व अवजड वाहने पार्क केलेली होती. पार्क केलेल्या वाहनांच्या संदर्भात घाटावरील कर्मचाऱ्यांना विचारले असता, ही वाहने बाहेरची असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेतर्फे घाटाचे संचालन करण्यात येते. घाटावर मनपाचे कार्यालय सुद्धा आहे. सुरक्षा गार्ड सुद्धा तैनात केले आहे. असे असतानाही बाहेरच्या वाहनांचे पार्किंग येथे करण्यात येत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, घाटावरील मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वाहनांना पार्किंग करण्याची परवानगी दिली जाते.