आयोगाची बूम, बाजारात धूम

By admin | Published: July 25, 2016 02:19 AM2016-07-25T02:19:26+5:302016-07-25T02:19:26+5:30

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. आयोगाची बूम आता बाजारात धूम करणार आहे.

Commission boom, market tremendous | आयोगाची बूम, बाजारात धूम

आयोगाची बूम, बाजारात धूम

Next

घर बांधणी आवाक्यात : बांधकाम साहित्यांचे दर १० टक्क्यांनी घटले
जितेंद्र ढवळे नागपूर
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. आयोगाची बूम आता बाजारात धूम करणार आहे. गत वर्षभरात बांधकाम साहित्यात झालेली वाढ आवाक्यात आल्याने, घरबांधण्याचे स्वप्नही आता वास्तवात साकारणार आहे. प्रस्तुत प्रतिनिधींनी शहरातील बांधकाम साहित्यांची विक्री करणाऱ्या विविध बाजारांचा आढावा घेतला असता, बांधकाम साहित्यात १० ते १५ टक्क्यांची घट दिसून आली आहे.

बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण असतानाही घरांच्या किमती आकाशाला भिडल्याची अशी नागरिकांची ओरड आहे.मात्र कर्मचाऱ्यांना आयोग लागू झाल्यानंतर फ्लॅट खरेदी करणारे वाढणार असल्याने गतवर्षीचे दर यंदाही कायम राहतील, असे एका बांधकाम व्यावसायिकाने स्पष्ट केले. एकीकडे विटा वगळता रेती, गिट्टी, लोखंड, सिमेंटच्या दरात घट झाली आहे. मिस्त्री आणि कुलीच्या दरात मात्र वाढ झाली आहे.

रेती ६,००० रु. ट्रक
दोन वर्षांच्या तुलनेत रेतीचे दर ८०० रुपयांनी कमी झाले आहे. मे २०१४ मध्ये रेतीचा दर ६,८०० रुपये प्रति ट्रक होता. यंदा ६ हजार रुपये प्रति ट्रक (२००फूट/२ ब्रास) इतका आहे. अवैध उत्खनन आणि रेतीघाटावर ड्रोनद्वारे ठेवली जाणारी पाळत यामुळे रेतीचे दर पुन्हा आटोक्यात येईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

विटा हजार ४,४०० रु.
विटांचा दर हजारी हिशेब पाहिल्यास यंदा दर ४,४०० रुपयावर गेला आहे. उन्हाळ्यात हा दर ३ हजार ८०० रुपयावर होता. दोन वर्षांपूर्वी विटा ६,८०० रुपये दरांनी विकल्या गेल्या. पावसाळ्यात विटभट्टी बंद असल्याने विटांच्या दरात वाढ होते. मात्र मागणी वाढल्यास हेही दर आटोक्यात येतील.

सिमेंट २७,५०० रुपयात १०० पोती
सहा महिन्यात ३५० रुपये प्रति पोते गेलेले सिमेंटचे दर आता २७५ रुपये इतके झाले आहे. २७ हजार ५०० रुपयात १०० पोती सिमेंट आता शहरातील चिल्लर ट्रेडर्सकडे उपलब्ध आहे.
गिट्टी ५,४०० रुपये ट्रक
दोन वर्षांपूर्वी ६ हजार रुपये प्रति ट्रक असा दर असलेली गिट्टी यंदा ५,४०० रुपयांवर आली आहे. चार महिन्यांपूर्वी गिट्टीचा दर ५ हजार रुपये ट्रक (२०० फूट) होता. सुरू असलेले बांधकाम आणि मागणीनुसार विक्रेते गिट्टीचे दर ठरवितात.

लोखंड ३२ हजार रुपये टन
मागणीनुसार लोखंडाच्या किमती कमी-जास्त होतात. गत दोन वर्षांच्या तुलनेत यात घट झाली होती. मे २०१४ लोखंडाचा दर ४५ हजार रुपये टन इतका होता. यावेळी लोखंडाचे दर कमी असले तरी मागणी कमी आहे.

मजुरांनाही दिलासा
बांधकामात कुशल कामगार महत्त्वपूर्ण असतात. त्यांची मजुरीही दीडपटीने वाढली आहे. सध्या कुली ३५० रुपये तर महिला २५० रुपये रोजी घेतात; शिवाय मिस्त्री५०० ते ५५० रुपयांपर्यंत मजुरीमागतात.
 

Web Title: Commission boom, market tremendous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.