उपराजधानीत उघड्यावर लघुशंका करणाऱ्याच्या स्वत: आयुक्तांनी आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 09:09 PM2020-03-02T21:09:12+5:302020-03-02T21:11:26+5:30
सकाळी कार्यालयात येत असताना पारशीबंगल्या पुढील पुनम प्लॉझाजवळून मनपाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या नाल्यावर लघुशंका करणाऱ्या उपद्रवीच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: मुसक्या आवळल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सकाळी कार्यालयात येत असताना पारशीबंगल्या पुढील पुनम प्लॉझाजवळून मनपाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या नाल्यावर लघुशंका करणाऱ्या उपद्रवीच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: मुसक्या आवळल्या. सोमवारी सकाळी कार्यालयामध्ये येतानाच आयुक्तांनी कारवाईने दिवसाची सुरूवात केली.
पुनम प्लॉझा जवळून मनपाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या नाल्यावर लघुशंका करणारा इसम आढळताच आयुक्तांनी त्याला पकडून मनपा कार्यालयात हजर केले. मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सदर उपद्रवीकडून ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला. प्रदीप विष्णुजी बुरकुरे असे या उपद्रवीचे नाव असून तो जिल्हा न्याय मंदिर येथे चपराशी पदावर कार्यरत आहे. सदर कारवाई संदर्भात महापालिकेतर्फे जिल्हा न्यायालयाला पत्र पाठविण्यात येणार आहे.
आपल्या शहराच्या स्वच्छता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघवी करणे या वाईट सवयी टाळा. प्रसाधनगृहांचा वापर करा, उघड््यावर लघवी करताना आढळल्यास उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जाईल. असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.