... म्हणून नागपुरातील क्राईम रेट जास्त दिसतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 11:01 AM2021-10-26T11:01:24+5:302021-10-26T14:21:37+5:30
गेल्यावर्षी कोविड संसर्गाच्या अनुषंगाने कलम १८८ अन्वये १३ तर यंदा १२ हजार गुन्हे नोंदविण्यात आले. एनसीआरबीच्या अहवालात हे गुन्हेही जोडले गेले. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या प्रचंड फुगली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जनगणना आणि लोकसंख्येच्याआधारे एनसीआरबीत देशातील विविध महानगरांतील क्राईम रेकॉर्ड तयार होतो. २०११ ला नागपुरातील लोकसंख्या सुमारे २५ लाख होती. त्यात आता किमान पाच लाखांची भर पडली आहे. ते ध्यानात घेतले जात नसल्यामुळेच नागपुरातील क्राईम रेट जास्त दिसतो, असे मत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केले.
नागपूरला अलीकडे क्राईम कॅपिटल म्हणून संबोधले जाते. मात्र, हे वास्तव नसल्याचे ते म्हणाले. २०११ नंतर नागपूरचा वेगाने विस्तार झाला आहे. कामठीचे दोन आणि हिंगणा असे तीन नवीन पोलीस स्टेशन शहराला जोडले गेले. त्यातील गुन्ह्यांची संख्याही अर्थातच नागपूर आयुक्तालयात गणली जाते. गेल्यावर्षी कोविड संसर्गाच्या अनुषंगाने कलम १८८ अन्वये १३ तर यंदा १२ हजार गुन्हे नोंदविण्यात आले. एनसीआरबीच्या अहवालात हे गुन्हेही जोडले गेले. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या प्रचंड फुगली. गुन्हे वाढणे ही बाब चांगली नाही आणि आपल्याला ती मान्यही नाही, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
हत्येच्या गुन्ह्यांच्या संबंधाने त्यांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ च्या दरम्यान ७९ हत्येचे गुन्हे घडले. त्यातील २१ गुन्हे अचानक उद्भवलेल्या कारणामुळे झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अचानक उद्भवलेल्या वादातून झालेल्या हत्येचे गुन्हे रोखता येत नाहीत. मात्र, एखाद्या शहरात सतत हत्येचे गुन्हे घडत असेल, तर ही बाब चांगली नसल्याचेही त्यांनी मान्य केले. या संबंधाने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीसोबत एक करार करून घडलेल्या गुन्ह्यांची कारणमीमांसा शोधण्यात आली असून, यानंतर ते गुन्हे कसे रोखावे, त्यासंबंधाने उपाययोजना तयार करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
ही आहेत कारणे -
गेल्या १० महिन्यांत घडलेल्या हत्येच्या ७९ घटनांमध्ये २१ गुन्हे कुटुंब कलह, शेजाऱ्यांशी वाद, भांडण सोडविण्यास जाण्याच्या कारणातून घडले. अनैतिक आणि प्रेम संबंध, चारित्र्यावर संशय आदी कारणांवरून १६, तर जुन्या वैमनस्यातून १६ जणांची हत्या करण्यात आली. भिकाऱ्यांमधील वाद, दारूत झालेले भांडण अशा कारणावरून १० जणांची, तर पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या झाली.
१७० बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी
१६७ गुन्ह्यांमधील आरोपी ओळखीचे
यावर्षी बलात्काराचे १७० गुन्हे दाखल झाले. त्यातील १६७ गुन्ह्यांमधील आरोपी तक्रारदार महिला-मुलीच्या संपर्कातील आहे. प्रेम प्रकरण, अनैतिक संबंधाचा बोभाटा, लग्नास नकार देणे, आदी कारणे या गुन्ह्यांमागे आहेत. मात्र, महिला-मुलींच्या अत्याचाराच्या संबंधाने पोलीस अतिशय गंभीर असून, आरोपींना कठोर शासन व्हावे, यासाठी ‘ॲक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस उपायुक्ताला ५ गुन्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली असून, जलदगती न्यायालयात सुनावणी चालवून आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे.
कोरोनानंतर नशाखोरी वाढली
कोविडमुळे शाळा-महाविद्यालये बंद झाली. श्रीमंतांच्या तुलनेत गरीब कुटुंबातील मुलांना ऑनलाईन शिक्षणाची साधनं उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत, असे एका अभ्यासातून पुढे आल्याचे पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले. शाळा-महाविद्यालयापासून दुरावलेली ही मुले पानटपरी आणि चौकात गर्दी करत असून, समाजकंटकाच्या जाळ्यात ते अडकत आहेत. त्यामुळे नशाखोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी गेल्या ९ महिन्यांत मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या २८६ आरोपींना अटक करून अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींनी अंमली पदार्थाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचा धक्कादायक खुलासा केल्याचेही पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले.