महापौर व स्थायी समिती अध्यक्षांची मागणी आयुक्तांनी धुडकावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 08:26 PM2020-06-03T20:26:41+5:302020-06-03T20:28:56+5:30
महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष सुरू आहे. त्यात आयुक्तांनी महापौर संदीप जोशी व स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे. पत्रात केलेली मागणी धुडकावल्याने पदाधिकारी व आयुक्त याच्यांतील वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष सुरू आहे. त्यात आयुक्तांनी महापौर संदीप जोशी व स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे. पत्रात केलेली मागणी धुडकावल्याने पदाधिकारी व आयुक्त याच्यांतील वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
मागील १२ वर्षापासून स्थायी समिती अध्यक्षांचे ओएसडी म्हणून प्रफुल्ल फरकासे जबाबदारी सांभाळत होते. अर्थातच स्थायी समितीचा अर्थसंकल्प तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असायची. आयुक्तांनी स्थायी समिती अध्यक्षांना कोणतीही सूचना न देता दोन महिन्यापूर्वी त्यांची धंतोली झोन कार्यालयात बदली केली. २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी फरकासे यांना दहा दिवसासाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात यावे, अशा आशयाचे पत्र पिंटू झलके यांनी आयुक्तांना दिले. सोबतच मोबाईलवरून या संदर्भात चर्चा केली. परंतु आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. त्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी २९ मे रोजी आयुक्तांना पत्र दिले. अर्थसंकल्पासाठी फरकासे यांना उपलब्ध करावे, अशी सूचना या पत्रातून केली. तसेच महापालिका कायद्यानुसार आयुक्तांच्या सुट्या मंजूर करणे, न करण्याचे अधिकार स्थायी समिती अध्यक्षांना आहेत. असे असतानाही झलके यांनी फरकासे यांच्या बदलीवर कोणतीही प्रतिक्रि या दिली नाही. एखाद्या अधिकाऱ्याला अर्थसंकल्पाच्या कामाकरिता दहा दिवसासाठी मागितले असेल तर फार मोठे पाप केलेले नाही. एवढा आडमुठेपणा कशासाठी? स्थायी समिती व सभागृहापेक्षा आपण सर्वशक्तिमान आहात, असा टोलाही या पत्रातून लगावला आहे.
आयुक्तांनी महापौरांना कळविला नकार
मनपाचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रफुल्ल फरकासे यांना दहा दिवसासाठी स्थायी समितीकडे देण्याची मागणी आयुक्तांनी धुडकावली आहे. फरकासे कनिष्ठ अभियंता असून त्यांचा अर्थसंकल्पाशी कोणताही संबंध नाही. तथापि लेखा व वित्त विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणे अभिप्रेत असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौरांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आयुक्तांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश
स्थायी समिती अध्यक्ष व महापौरांची मागणी आयुक्तांनी धुडकावली. याचे पडसाद सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. समितीच्या बैठकीला अनुपस्थित लेखा व वित्त अधिकाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे तर समितीच्या पुढील बैठकीला आयुक्तांनी उपस्थित राहावे, असे निर्देश पिंटू झलके यांनी दिले. या निर्देशानुसार आयुक्त उपस्थित राहातात की निर्देश धुडकावतात, यावरून पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे.