आयुक्तांचा बाबूगिरीला चाप
By admin | Published: August 19, 2015 02:59 AM2015-08-19T02:59:05+5:302015-08-19T02:59:05+5:30
पोलीस आयुक्त बाहेरगावी असताना बाबूने केलेली बदली त्याच्या अंगलट आली. आपल्या अपरोक्ष बदली झाल्याचे लक्षात येताच पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी ‘त्या’ बाबूला सोमवारी तडकाफडकी निलंबित केले.
नागपूर : पोलीस आयुक्त बाहेरगावी असताना बाबूने केलेली बदली त्याच्या अंगलट आली. आपल्या अपरोक्ष बदली झाल्याचे लक्षात येताच पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी ‘त्या’ बाबूला सोमवारी तडकाफडकी निलंबित केले. पी.एस. वाणी असे निलंबित कर्मचाऱ्याचे नाव असून, ते आयुक्तालयात वरिष्ठ लिपिक होते.
यापूर्वीचे आयुक्त कौशल किशोर पाठक यांच्या वाहनावर चालक असलेला शाहरुख याची काही दिवसांपूर्वी बदली झाली. मात्र त्याला रिलिव्ह करण्यात आले नव्हते. तो बाबूंकडे तगादा लावून होता. मात्र पोलीस आयुक्त यादव यांनी त्याला आपल्या वाहनावर चालक म्हणून नियुक्त केल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला रिलिव्ह करण्याचे टाळले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी आयुक्त यादव मुंबईत बैठकीला गेले. त्या कालावधीत बडे बाबू वाणी यांनी शाहरुखला रिलिव्ह केले. यादव मुंबईहून परतल्यानंतर त्यांना शाहरुख दिसला नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या अनुपस्थितीत शाहरुखला रिलिव्ह करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यादव यांनी बडे बाबू वाणीच्या निलंबनाचे आदेश दिले. सोमवारी वाणी यांना निलंबित केल्याचे माहीत पडताच आयुक्तालयातील कर्मचारी हादरले.(प्रतिनिधी)