मानवतेशी कमिटमेंट हीच आजची गरज; गिरीश गांधी यांचा अमृत महोत्सवी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 10:29 PM2022-07-23T22:29:20+5:302022-07-23T22:30:23+5:30
Nagpur News ज्यांचे अंत:करण स्वच्छ आहे, मानवतेशीच ज्यांची कमिटमेंट आहे, अशा लोकांचीच आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले.
नागपूर : ज्यांचे अंत:करण स्वच्छ आहे, मानवतेशीच ज्यांची कमिटमेंट आहे, अशा लोकांचीच आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले. गिरीश गांधी असेच व्यक्तिमत्त्व आहे. ते समाजातील वेदना जाणणारे आहेत. त्यांचे अंत:करण स्वच्छ आहे. त्यांची कमिटमेंट ही केवळ मानवतेशी आहे, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले, त्यानिमित्त शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार करताना ते बोलत होते. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे अध्यक्षस्थानी होते. तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, आ. अभिजित वंजारी, खा. कृपाल तुमाने, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, न्या. विकास सिरपूरकर, न्या. विजय डागा, न्या. जे. एन. पटेल, न्या. अरुण चौधरी, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, अजय संचेती, माजी मंत्री रमेश बंग, प्रा. जोगेंद्र कवाडे, जयप्रकाश गुप्ता, अनंतराव घारड, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, सुनीता गावंडे, आदी उपस्थित होते.
आयोजन समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गिरीशभाऊंनी पर्यावरण, साहित्य, संस्कृती, कला, नाटक, पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी आपल्या जीवनात जे काम केले, त्याची प्रेरणा नवीन पिढीला मिळावी.
यावेळी दत्ता मेघे, अरुण गुजराथी, मधुकर भावे, न्या. विकास सिरपूरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना गिरीश गांधी म्हणाले, मी पक्का लोकशाहीवादी आहे. लोकशाही वाचविण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. लोकशाही टिकली व साामाजिक सौहार्द टिकले तरच हा देश टिकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक श्रीकांत तिडके यांनी केले. अतुल कोटेचा यांनी स्वागतपर भाषण केले. संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. शुभदा फडणवीस यांनी मानपत्राचे वाचन केले. अरुणा सबाने यांनी आभार मानले.
- सामाजिक कार्यासाठी २१ लाखांची थैली
यावेळी गिरीश गांधी यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी आयोजन समितीच्या वतीने गिरीश गांधी यांच्या सामाजिक कार्यासाठी २१ लाखांची थैली प्रदान करण्यात आली.