सर्प व राज्य कोळी ठरविण्यासाठी समिती : राज्य शासनाची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 11:28 PM2021-04-02T23:28:22+5:302021-04-02T23:30:46+5:30
snakes and state spider वनस्पती आणि फुलपाखरानंतर सापाच्या काेणत्या प्रजातीला राज्य सर्प आणि काेळी किटकाच्या काेणत्या प्रजातीला राज्य काेळी म्हणून मान द्यावा, हे ठरविण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनस्पती आणि फुलपाखरानंतर सापाच्या काेणत्या प्रजातीला राज्य सर्प आणि काेळी किटकाच्या काेणत्या प्रजातीला राज्य काेळी म्हणून मान द्यावा, हे ठरविण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. राज्याचे निसर्ग मानचिन्ह ठरविताना काेणते निकष महत्त्वाचे ठरविले जावे, याबाबतही समिती सर्वसमावेशक कार्य करणार आहे.
राज्य वन्यजीव मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये राज्य सर्प व राज्य काेळी असे राज्याचे निसर्ग मानचिन्ह ठरविण्याबाबतचा विषय प्रस्तावित हाेता. निसर्ग मानचिन्ह घाेषित करावयाच्या प्रजातींचे मानवी जीवनातील व परिसंस्थेतील महत्त्व, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यतेनुसार त्या प्रजातीची धाेकाग्रस्त असण्याची परिस्थिती, त्यांची संख्या, काेणत्या प्रदेशात अधिक अस्तित्व, त्या प्रजातीवर भविष्यातील धाेके आणि त्यादृष्टीने त्यांचे संवर्धन करण्याबाबत लाेकांमध्ये जनजागृती करण्याबाबतचे नियाेजन हाेणे आवश्यक आहे. राज्याचे अधिकतम किती निसर्ग मानचिन्ह असावेत जेणेकरून त्या मानचिन्हाचे महत्त्व अबाधित राहील, यावरही विचार हाेणे गरजेचे झाले आहे. निसर्ग मानचिन्हाबाबतचा सर्वंकष निर्णय घेण्यासाठी ही तज्ज्ञांची सर्वसमावेशक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जैवविविधतेच्या विविध शाखांमध्ये असलेले अनुभवी अभ्यासक, झुआलाॅजिकल सर्वे ऑफ इंडियाचे तज्ज्ञ, कीटकशास्त्र व वनस्पती शास्त्रातील तज्ज्ञ, ज्येष्ठ वनाधिकारी अशा विविध विषयातील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये हे समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डाॅ. रविकिरण गाेवेकर यांच्यासह झुआलाॅजिकल सर्वे ऑफ इंडिया व बाॅटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे तज्ज्ञ प्रतिनिधी या समितीचे सदस्य असतील. समितीद्वारे राज्य सर्प व राज्य काेळी घाेषित करताना त्याचे परिसंस्थेतील महत्त्व तसेच त्या प्रजातीच्या संवर्धनाबाबतचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.