कोविड उपचारावरील दर ठरविण्यासाठी नागपुरात समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 08:17 PM2020-07-27T20:17:11+5:302020-07-27T20:18:57+5:30
अन्य शहरांमध्ये कोविडवरील उपचारांवर खासगी इस्पितळांनी अवाजवी दर आकारल्याने असंतोष निर्माण झाला आहे. नागपुरात तो होऊ नये म्हणून विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन खासगी इस्पितळांमधील दरासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्य शहरांमध्ये कोविडवरील उपचारांवर खासगी इस्पितळांनी अवाजवी दर आकारल्याने असंतोष निर्माण झाला आहे. नागपुरात तो होऊ नये म्हणून विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन खासगी इस्पितळांमधील दरासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, ही बैठक शनिवारी झाली. मात्र, सोमवारी मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयांनी प्रत्येकी एका अधिकाऱ्याला सोमवारी शहरातील खासगी रुग्णालयात बसवून रुग्णांच्या देयकाची तपासणी सुरू केल्याने गोंधळ उडाला.
बैठकीमध्ये अनेक बाबींवर चर्चा झाली. समितीला कोविडवरील उपचारावरील दर ठरविण्यासाठी अभ्यास करण्याच्या सूचनाही केल्या. याशिवाय सर्व रक्त तपासणी केंद्र, खासगी इस्पितळांनी अॅन्टिजन चाचण्यांना सुरुवात करावी, त्यासाठी आरोग्य उपसंचालकांनी अॅन्टिजन टेस्ट किटचा स्टॉल आयएमएमध्ये लावून ५०० ते ५२५ शुल्क देऊन चाचणी करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या. सौम्य लक्षण असलेल्या अथवा लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टर्स आणि हॉटेल्सने मिळून पुढाकार घेण्याचेही त्यांनी सुचविले. शासकीय इस्पितळांमधील बेड्स भरल्यानंतरच खासगी इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येईल, असेही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले. बैठकीला विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट, सचिव डॉ. आलोक उमरे, समन्वयक डॉ. अनुप मरार, आयएमए अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी व इतरही खासगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. परंतु समिती स्थापन होण्यापूर्वीच शासनाचे अधिकारी सोमवारी खासगी हॉस्पिटलमध्ये खुर्ची टाकून रुग्णांचे देयक तपासू लागल्याने हॉस्पिटलनी याला विरोध केला. यामुळे प्रशासन आणि खासगी हॉस्पिटलमधील वाद समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.