अवैध सावकारांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:44 AM2019-12-21T00:44:02+5:302019-12-21T00:48:02+5:30
राज्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी व अशा सावरकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची घोषणा सहकार मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी व अशा सावरकारांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची घोषणा सहकार मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
विद्या चव्हाण यांनी नियम ९३ अन्वये अवैध सावकारी संदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकाळ चर्चेच्या उत्तरात पाटील बोलत होते. ते म्हणाले, माजी मंत्री आर.आर. पाटील यांनी अवैध सावकारी विरोधात कायदा आणला. या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व निबंधकांना दिल्या आहेत. मात्र अवैध सावकारांविरुद्ध सहकार विभागातील उपनिबंधक कारवाई करण्यास टाळटाळ करत असल्याबाबतच्या गंभीर तक्रारी आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाईची शिफारस करण्यासाठी तसेच अवैध सावकारी कायद्यात सुधारणा सुचविण्याचे काम ही समिती करणार आहे. मागील पाच वर्षात राज्यात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली. तीन महिन्यात यावर जरब बसविण्यासाठी सावकारी कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. या समितीत विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग, सुरेश धस, गिरीश व्यास आदींचा समावेश असेल तसेच सहकार व महसूल विभागातील अधिकारी दिले जातील, अशी माहिती पाटील यांनी दिली. अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी या समितीने सुचविलेल्या सूचनांचा समावेश कायद्यात करण्यात येईल. चर्चेत ख्वाजा बेग, सुरेश धस, गिरीश व्यास आदींनी सहभाग घेतला.