संवादातूनच मार्ग निघतो; संप मागे घेतल्याबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 09:06 PM2023-03-20T21:06:31+5:302023-03-20T21:07:08+5:30
Nagpur News राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संघटना आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. संवादातूनच मार्ग निघत असतो आणि तो संवाद आम्ही केला, असेही त्यांनी म्हटले आहे.
नागपूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संघटना आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. संवादातूनच मार्ग निघत असतो आणि तो संवाद आम्ही केला, असेही त्यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला, ही आनंदाची गोष्ट आहे. सोमवारी दुपारी माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली होती. आम्ही कुठलाही अहंभाव न बाळगता सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका जाणून घेतली. आडमुठी भूमिका कधीच घेतली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांचे हित पाहणारेच आम्ही आहोत. सामाजिक सुरक्षेची भूमिका तत्त्व म्हणून आम्ही आधीच मान्य केली होती. आता चर्चेचे मुद्दे निश्चित करून समितीपुढे ते ठेवण्यात आले आहेत. समिती त्यावर निर्णय घेईल. पहिल्या दिवशीपासून आम्ही संवादाचा प्रयत्न करीत होतो. त्यांनी संप मागे घेतला, याचा आनंद आहे. समितीला ३ महिन्यांचा कालावधी दिलेला आहे, त्यामुळे कालबद्ध वेळेतच समिती आपला अहवाल देईल. मी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचेही विशेष आभार मानतो, असेही त्यांनी सांगितले.