जीवनात विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वाचे : मान्यवरांचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:53 AM2019-08-08T00:53:22+5:302019-08-08T00:55:33+5:30
सामाजिक जीवनात सर्वांगीण विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असल्याचा सूर मान्यवरांनी येथे काढला.संवाद कौशल्यावर ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स येथे बुधवारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक जीवनात सर्वांगीण विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असल्याचा सूर मान्यवरांनी येथे काढला.संवाद कौशल्यावर ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स येथे बुधवारी करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष डॉ. सुरेश राठी, विशेष अतिथी जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान सोसायटीच्या अध्यक्षा ज्योती बावनकुळे, शेफ विष्णू मनोहर, जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष रमेश गिरडे, समन्वयक विजय जथे आणि आयोजक मनीषा बावनकर उपस्थित होते.
संवाद कौशल्यावर बोलताना सुरेश राठी म्हणाले, मानवजातीचा विकास मुख्यत्वे मनुष्यामधील कुशल संवादामुळे होतो. संवाद जीवनातील आवश्यक भाग आणि एक सामाजिक कौशल्य आहे. श्वेता शेलगावकर म्हणाल्या, सार्वजनिक जीवनात बोलताना विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये कुशलता आवश्यक आहे. ऑल इंडिया रेडिओचे उद्घोषक किशन शर्मा यांनी योग्य संवाद आणि भाषेचे महत्त्व सांगितले आणि या क्षेत्रातील अनुभव कथन केले. विष्णू मनोहर यांनी टीव्ही, लाईव्ह अँकरिंग, न्यूज रीडर आणि मुलाखतीचे महत्त्व सांगितले. स्टॅण्डअप कॉमेडी व समालोचन यावर विशेष सत्र घेतले. या सत्राला प्रेक्षकांनी दाद दिली.
कार्यक्रमात आकार गु्रप ऑफ इन्स्टिट्युशन्स, हिंगणा, अॅप्टेक एव्हिएशन अकॅडमी, आदर्श विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्रीमती कौशल्यादेवी माहेश्वरी महिला महाविद्यालय, आंबेडकर कॉलेज, संताजी कॉलेज, धनवटे नॅशनल कॉलेज, एलएडी कॉलेज सेमिनरी हिल्स, शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज आणि सेवादल कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमात विष्णू मनोहर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. विशेष अतिथी ज्योती बावनकुळे, नीलिमा बावणे, वंदना शर्मा आणि भास्कर रागीट उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक विजय जथे यांनी तर आयोजन मास्क इव्हेंट ऑर्गनायझर व लाईफ स्टाईल स्टोअरच्या संचालिका मनीषा बावनकर यांनी केले. आभार मनीषा बावनकर यांनी मानले.