सामुदायिक प्रयत्नांनी कमी होईल कॉर्बनचे उत्सर्जन : विक्रम किर्लोस्कर यांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 09:26 PM2020-02-08T21:26:22+5:302020-02-08T21:30:11+5:30
रोजच्या सवयी बदलवून सामुदायिक प्रयत्नांनीच कॉर्बन उत्सर्जन कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन किर्लोस्कर सिस्टीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन विक्रम किर्लोस्कर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉर्बनचे उत्सर्जन (एमिशन) ही आज जगाला भेडसावणारी समस्या आहे. सातत्याने वाढते तापमान, वाढते प्रदूषण यामुळे पृथ्वीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कॉर्बन फूटप्रिन्ट कमी करण्यासाठी उद्योगांवर मोठी जबाबदारी आली आहे. मात्र अमुक तंत्रज्ञान वापराने कॉर्बन उत्सर्जन कमी होईल, असे सांगणे हास्यास्पद ठरेल. यासाठी प्रत्येकाने रोजच्या सवयी बदलवून सामुदायिक प्रयत्नांनीच हे शक्य होऊ शकेल, असे प्रतिपादन किर्लोस्कर सिस्टीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन विक्रम किर्लोस्कर यांनी केले.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांतर्गत शनिवारी ‘कॉर्बन धोरण : काळाची गरज’ या विषयावर किर्लोस्कर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार आणि संचालक प्रा. प्रमोद पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते. विक्रम किर्लोस्कर यांनी कॉर्बन उत्सर्जनाच्या वर्तमान परिस्थितीवर प्रकाश टाकला. आपल्या देशात सर्वाधिक ५० टक्के कार्बन उत्सर्जन औष्णिक ऊर्जा प्रकल्पामधून होते आणि चिंताजनक म्हणजे ऊर्जेची सर्वाधिक ७६ टक्के गरज कोळशावरच अवलंबून आहे. त्याखालोखाल २० टक्के कार्बन उत्सर्जन वाहनांमुळे होते. यामध्ये सर्वाधिक पेट्रोल वाहन, त्याखाली इलेक्ट्रीक वाहने आणि सर्वात कमी उत्सर्जन आधुनिक हायब्रीड वाहनांमुळे होते. मात्र हायब्रीड वाहनांचे चलन आपल्या देशात अद्याप यायचे आहे. उर्वरीत प्रदूषण हे उद्योग आणि नागरिकांच्या दैनंदिन सवयीमुळे होते. चिंतेत भर टाकणारी बाब म्हणजे भविष्यात किंवा २०५० पर्यंतच ऊर्जेची गरज तिपटीने वाढणार असून कोळशाऐवजी पर्यावरणपूरक पर्यायाबाबतची उपलब्धता अद्यापही समाधानकारक नाही. त्यामुळे प्रदूषणाचे किती संकट झेलावे लागणार आहे, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
किर्लोस्कर पुढे म्हणाले, शासनातर्फे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अमुक तंत्रज्ञान वापरा, अशा सूचना केल्या जातात. मात्र त्यापेक्षा सरकारने कार्बन फूटप्रिन्टचे प्रमाण किती आहे आणि किती टक्के कमी करायचे आहे, याबाबत सूचित करायला हवे. त्यांनी स्वत:च्या कंपनीचे उदाहरण सादर केले. गेल्या ५ वर्षात कंपनीने स्वत: पुढाकार घेउन प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत आणि त्यात मोठे यश प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे त्या परिसरातील जलस्तर १५ मीटरने वाढल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी यावेळी कृषी कचरा जाळण्याबाबतही धोरण ठरविणे आवश्यक असल्याचे नमूद केले. याशिवाय नागरिकांनीही दैनंदिन सवयीमध्ये पर्यावरणपूरक बदल केल्यास मोठी मदत होईल, असे मत व्यक्त करीत तरुणांनी या दृष्टीने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नीरा धाबू यांनी केले तर प्रा. डी. आर. पेशवे यांनी आभार मानले.