दोन सरकारची जनतेत तुलना करा

By admin | Published: November 1, 2015 03:11 AM2015-11-01T03:11:42+5:302015-11-01T03:11:42+5:30

वर्षभरात कोणत्याही सरकारचे मूल्यमापन करू शकत नाही. काँग्रेस- राष्ट्रवादीचे आघाडी सरकार १५ वर्षात जी कामे करू शकले नाही, ...

Compare the two governments with the public | दोन सरकारची जनतेत तुलना करा

दोन सरकारची जनतेत तुलना करा

Next

रावसाहेब दानवे यांचे आवाहन : राज्य सरकारची वर्षपूर्ती
नागपूर : वर्षभरात कोणत्याही सरकारचे मूल्यमापन करू शकत नाही. काँग्रेस- राष्ट्रवादीचे आघाडी सरकार १५ वर्षात जी कामे करू शकले नाही, त्या कामांना भाजपप्रणित राज्य सरकारने गेल्या वर्षभरात सुरुवात केली आहे. अनेक प्रश्न निकाली काढले आहे. एखादे सरकार पडते तेव्हा आपण केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यात कमी पडलो, अशी खंत व्यक्त केली जाते. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून भाजप सरकारने वर्षभरात घेतलेले निर्णय जनतेत घेऊन जा व दोन सरकारमध्ये जनतेत तुलना करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले.
राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त नागपूर शहर व ग्रामीण भाजपतर्फे शनिवारी गांधीसागर परिसरातील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात लोकसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून खा. दानवे यांनी राज्य सरकारने वर्षभरात घेतलेल्या निर्णयाचा पाढा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर वाचला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. सुधाकरराव देशमुख, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, माजी आ. अशोक मानकर उपस्थित होते.दानवे म्हणाले, गेल्या सरकारने २४ दलघमी पाणी अडविण्यासाठी ७ हजार कोटी रुपये खर्च केले. भाजप सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तेवढेच पाणी फक्त ९०० कोटींत अडवले. पूर्वी ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी आली तरच दुष्काळ ग्राह्य धरला जायचा. आम्ही ३३ टक्के पैसेवारीचा निर्णय घेतला व नुकसान भरपाईपोटी किमान एक हजार रुपयांच्या खालचे चेक द्यायचे नाही, असा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना झिरो बॅलेन्सवर बँकेत खाते उघडून दिले. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज मिळत नव्हती. आम्ही मागेल त्याला कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडनमधील घर राज्य सरकारने विकत घेतले. तेथेही स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जपानमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केले. दुसरीकडे काँग्रेसने मात्र या मागण्या प्रलंबित ठेवल्या. तसेच भंडारा, मुंबईत बाबासाहेबांना लोकसभा निवडणुकीत हरविण्याचे काम काँग्रेसने केले, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला नाही. मात्र, आम्ही लवकरच कामाला सुरुवात करणार असून पंतप्रधान त्यासाठी पुन्हा एकदा मुंबईत येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

हिवाळी अधिवेशनापूर्वी  जिल्हा बँक सुरू होणार
जिल्हा बँकेत दीडशे कोटींचा घोटाळा झाला. त्यामुळे बँक डबघाईस येऊन बंद पडली. मात्र, शेतकऱ्यांचे हित विचारात घेता ही बँक सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी जिल्हा बँक सुरू होईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. घोटाळेबाजांवर कायद्यानुसार कारवाई होईल. मात्र, शेतकऱ्यांना वेठीस धरता कामा नये. यामुळेच रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या निर्देशानुसार आवश्यक असलेली रक्कम जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

दक्षिण नागपूरचा वर्षपूर्ती अहवाल प्रकाशित
दक्षिण नागपूरचे आ. सुधाकर कोहळे यांनी गेल्या वर्षभरात आपल्या मतदारसंघात केलेल्या कामांचा लेखाजोख मांडणारा अहवाल तयार केला आहे. या अहवालाचे प्रकाशन मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. शहर व जिल्ह्यात आपला वर्षपूर्ती अहवाल प्रकाशित करणारे कोहळे हे पहिले आमदार ठरले.
मेळाव्याला विलंब, कार्यकर्ते सुस्त
लोकसंवाद मेळाव्याची वेळ सकाळी १० ची होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष खा. दानवे मेळाव्यासाठी वेळेवर आले असते तर शिक्षकर सहकारी बँकेच्या सभागृहात पाच-पंचवीसही कार्यकर्ते दिसले नसते. तासभराने ११ पर्यंत सभागृह अर्धे भरले. ११.३५ वाजता दानवे आले असता सभागृह भरले होते. केंद्र, राज्य, महापालिका व जिल्हा परिषदेतही सत्ता असताना पक्षाच्या कार्यक्रमासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह का नाही, कार्यकर्ते वेळेचे बंधन का पाळत नाही, कार्यकर्ते सुस्त झाले आहेत का, अशी चर्चा याप्रसंगी उपस्थित नेत्यांमध्ये रंगली होती. कार्यक्रम वेळेत सुरू होत नाही, असा ग्रह झाला असल्यामुळे तर कार्यकर्ते उशिरा आले नसतील ना, असाही सूर लावल्या जात होता.

Web Title: Compare the two governments with the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.