श्रमाच्या समिधा अन् रस्त्याचा यज्ञ

By admin | Published: August 24, 2015 02:41 AM2015-08-24T02:41:33+5:302015-08-24T02:41:33+5:30

मी, माझे घर, माझे कुटुंब...या त्रयींच्या सभोवताल आयुष्य जगणाऱ्यांच्या या जगात काही माणसे अशीही असतात ज्यांना त्यांच्यावर असलेले समाजाचे ऋण अस्वस्थ करीत असते.

Compassion of labor and sacrifice of the road | श्रमाच्या समिधा अन् रस्त्याचा यज्ञ

श्रमाच्या समिधा अन् रस्त्याचा यज्ञ

Next

आदर्श कार्य : सेवानिवृत्त फुलझेलेंचा विधायक पुढाकार
लोकमत प्रेरणावाट
नागपूर : मी, माझे घर, माझे कुटुंब...या त्रयींच्या सभोवताल आयुष्य जगणाऱ्यांच्या या जगात काही माणसे अशीही असतात ज्यांना त्यांच्यावर असलेले समाजाचे ऋण अस्वस्थ करीत असते. एम.पी. फुलझेले त्यातलेच एक़ सेवानिवृत्त फुलझेले हे मूळचे नागपूरचेच असून ते सध्या दिल्लीत राहतात. पाऊस सुरू झाला की या कच्च्या पुलावरून पाणी जायचे. त्यामुळे गावातील लोकांचा संपर्कच तुटायचा. लहान मुलं शाळेत जाऊ शकत नव्हती. दुचाकी-चारचाकी वाहनं तर दूरच राहिली पायीसुद्धा जाणे कठीण होते. हे चित्र बदलण्यासाठी फुलझेले यांनी पुढाकार घेतला आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून कच्चा पुलाच्या जागी पक्का पूल तयार झाला. गावापर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता डांबरी रस्त्याने जोडला गेला.
नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचे शहर असले तरी नागपूरच्या सभोवतालच्या गावांची परिस्थिती अजूनही दयनीय अशीच आहे. नागपूरपासून २० कि.मी. अंतरावर पारशिवनी तालुक्यातील ताडसा ते मौदा या रोडवर निरज खंडारा (घटाटे ) हे गाव आहे. मुख्य रस्त्यापासून जवळपास तीन किलोमीटर आत हे गाव आहे. फुलझेले हे केंद्रीय मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले आहे. एस.एस.टी. अधिकाऱ्यांना ते विविध योजनांविषयी मार्गदर्शन करीत असतात. या गावात फुलझेले यांनी एक शेत घेतले असून त्यात त्यांनी ट्रेनिंग सेटर उभारले आहेत. यासाठी त्यांचे नागपुरात येणे-जाणे असते. २००७ सालची ही गोष्ट आहे. मुख्य रस्त्यापासून आत गावाला जाणारा रस्ता हा केवळ मातीचाच होता. रस्त्यावर एक नाला आहे. या नाल्यावर तीन-चार पाईप टाकून पूल तयार करण्यात आला होता. पाऊस सुरू झाला की या कच्च्या पुलावरून पाणी जायचे.
त्यामुळे गावातील लोकांचा संपर्कच तुटायचा. लहान मुले शाळेत जाऊ शकत नव्हती. दुचाकी-चारचाकी वाहनं तर दूरच राहिलीच पायीसुद्धा जाणे कठीण होते. पावसाळ्यात या गावाचा संपर्क इतरांशी नाहीच्या बरोबरच राहत असे. त्याच दरम्यान फुलझेले यांचे या गावात येणे झाले. त्यांनाही या रस्त्यामुळे मोठी अडचण होऊ लागली. केंद्र शासनात वरिष्ठ अधिकारी राहिल्यामुळे त्यानी शासन दरबारी दाद मागण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी गावातील वरिष्ठ व ज्येष्ठ मान्यवर नागरिकांना जागृत केले.
गावकऱ्यांचीही त्यांना साथ मिळाली. ग्राम पंचायतीच्या माध्यमातून तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मंंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करण्यात आला. नाव ग्राम पंचायतीचे राहत असे आणि पत्रव्यवहार स्वत: फुलझेले करायचे. यात दोन चार वर्षे उलटली परंतु प्रतिसाद मिळाला नाही.
मौद्यात एनटीपीसीचा मोठा प्रकल्प आहे. त्यांच्या सीएसआर निधीतून गावकऱ्यांना रस्त्यासाठी मदत होऊ शकते, ही बाब त्यांच्या लक्षात आली. याचदरम्यान त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत सुद्धा काही एनटीपीसीचे अधिकारी सहभागी झाल्याने त्यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यातून सीएसआर ही योजना गावकऱ्यांना समजावून सांगितली. मोठमोठ्या कंपन्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत त्यांच्या क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांसाठी काही निधी खर्च करावा लागतो. आपल्या क्षेत्रात एनटीपीसी सारखा मोठा प्रकल्प आहे. त्यांना आपण रस्ता बांधणीसाठी मदत करण्याची विनंती करण्याचे आवाहन केले. ग्राम पंचायतीसह गावकऱ्यांनाही त्यांचे म्हणणे पटले. त्यानंतर फुलझेले यांनी एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली.
त्यांच्याशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनाही सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली. तेव्हा त्यांना ही बिकट समस्या लक्षात आली. त्यांनी लगेच सर्व्हे केला आणि कामाला सुरुवात झाली. अवघ्या महिनाभरात गावापर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता डांबरी रस्त्याने जोडला गेला. (प्रतिनिधी)

Web Title: Compassion of labor and sacrifice of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.