तीन लाख रुपये नुकसान भरपाई द्या
By admin | Published: October 19, 2015 02:57 AM2015-10-19T02:57:05+5:302015-10-19T02:57:05+5:30
हिंगणा रोड नाका, संत गाडगेनगर येथील अरविंद नारायण पंडित यांनी दाखल केलेले प्रथम अपील राज्य ग्राहक तक्रार ...
राज्य ग्राहक आयोग : होमिओपॅथी डॉक्टरला आदेश
नागपूर : हिंगणा रोड नाका, संत गाडगेनगर येथील अरविंद नारायण पंडित यांनी दाखल केलेले प्रथम अपील राज्य ग्राहक तक्रार निर्मूलन आयोगाच्या नागपूर परिक्रमा खंडपीठाचे पीठासीन सदस्य बी. ए. शेख आणि सदस्य एस.बी. सावरकर यांनी अंशत: मंजूर करून टाकळी सिम मंगलधाम सोसायटी येथील होमिओपॅथी डॉक्टर राहुल डांगरे यांनी ३ लाख रुपये ९ टक्के व्याज दराने २६ जून २००६ पासून अपीलकर्त्यास नुकसान भरपाई म्हणून द्यावेत, असा आदेश दिला. याशिवाय मानसिक व शारीरिक त्रासासाठी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि १० हजार रुपये दाव्याचा खर्च द्यावा, असेही राज्य ग्राहक आयोगाने आपल्या निकालात नमूद केले आहे.
प्रकरण असे की, २२ फेब्रुवारी २००० रोजी अपीलकर्ते पंडित यांची पत्नी मीलन यांनी पोटात दुखत असल्याची तक्रार करताच त्यांना डॉ. राहुल डांगरे यांच्या दवाखान्यात नेण्यात आले होते. त्यांनी कोणतीही तपासणी न करता त्यांना बेरॉलगॉन आणि त्यानंतर एक्झामिथाझॉन ही इंजेक्शने दिली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीच खालावली. त्यांना डॉ. सुधीर वासिमकर यांच्या इस्पितळात नेण्यात आले असता त्यांचा आधीच मृत्यू झालेला होता. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. राहुल डांगरे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रारंभी अरविंद पंडित यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली होती. मंचाने दीड लाखांच्या नुकसान भरपाईचा आदेश दिला होता. याविरुद्ध डॉ. राहुल डांगरे यांनी राज्य ग्राहक आयोगाकडे अपील केले होते. आयोगाने अपील मंजूर करून मंचाचा आदेश स्थगित केला होता. या प्रकरणावर नव्याने सुनावण्याचा आदेश मंचला दिला होता. परंतु जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्षा सुनीता पडोळे यांनी तक्रार परत केली होती. फौजदारी प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर पुन्हा मंचापुढे दाद मागण्याची मुभा त्यांना देण्यात आली होती.
फौजदारी प्रकरणाचा निकाल डॉ. डांगरे यांच्या बाजूने लागला होता. न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर जिल्हा ग्राहक मंचाविरुद्ध पंडित यांनी राज्य ग्राहक आयोगाकडे अपील दाखल केले होते. आयोगापुढे अपीलकर्ते अरविंद पंडित यांच्या वतीने अॅड. व्ही.एस. धोबे यांनी तर प्रतिवादीच्या वतीने अॅड. महेश सिंग यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)