हजारो वर्षे हक्कापासून वंचित ठेवल्याची भरपाई करा :सुखदेव थोरात यांचे परखड मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:29 PM2019-08-24T23:29:09+5:302019-08-24T23:31:26+5:30
बहुजन समाजाची नुकसान भरपाई करावी, देशातील भेदभाव मिटवावा व मगच आरक्षणाला विरोध करावा, असे परखड मत युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशामध्ये अस्पृश्य वर्गावर २००० हजार वर्षापासून अत्याचार झाले. दलित व बहुजन समाजाला जमिन, उद्योगधंदे व शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. म्हणून ते भूमिहिन, अशिक्षित व उद्योगधंद्याविना राहिले व याचा लाभ उच्च वर्गाने घेतला. त्यामुळे या बहुजन समाजाची नुकसान भरपाई करावी, देशातील भेदभाव मिटवावा व मगच आरक्षणाला विरोध करावा, असे परखड मत युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.
बॅरिस्टर राजाभाउ खोब्रागडे प्रतिष्ठान आणि आवाज इंडिया टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरक्षण : इतिहास, प्रासंगिकता व भविष्य’ या विषयावर बॅ. राजाभाउ खोब्रागडे सभागृह, टेका नाका येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धनवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एस. चंगोले, आवाज इंडिया टीव्हीचे संचालक अमन कांबळे, राजाभाउ खोब्रागडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खोब्रागडे, भीमराव वैद्य, प्रितम बुलकुंदे उपस्थित होते. डॉ. थोरात पुढे म्हणाले, भारतामध्ये आजही प्रचंड असमानता आहे, बहुजन समाजातील कोट्यावधी लोकांना समान संधी नाकारल्या जात आहेत. देशामधे असलेला भेदभाव मिटावा, सर्वांना समान संधी प्राप्त व्हावी यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. जगातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये अफर्मिटीव्ह अॅक्शन अंतर्गत आरक्षण देण्यात येते पण भारतामध्ये मात्र आरक्षणाला विरोध केला जातो, ही शोकांतिका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हजारों वर्ष या देशातील बहुजन समाजाला शिक्षण, सम्पत्ति, जमीन आदि अनेक मूलभूत अधिकार नाकारण्यात आले. त्याची नुकसान भरपाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकेत या धोरनाची चर्चा सुरु आहे. यामध्ये जमीन वाटप, उद्योगधंद्यांचे वाटप आणि शैक्षणिक विकास आदी सुविधांचा समावेश असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. चंगोले यांनी सम्राट अशोक, शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात देश सुजलाम सुफलाम असल्याचे सांगत बहुजन शासकांच्या काळातच जनता सुखी राहते, असे विचार व्यक्त केले. अमन कांबळे यांनी विद्यापीठांचे कुलगुरू, न्यायपालिका किंवा प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरावर विशिष्ट वर्गालाच प्राधान्य का दिले जाते, असा सवाल करीत समान संधीचा पुरस्कार केला.
आरक्षणामुळे गुणवत्ता घटते हा खोटा प्रचार
आरक्षण दिल्यामुळे गुणवत्ता कमी होते, असा आक्षेप घेतला जातो. हा केवळ खोटा प्रचार नसून हे एक षडयंत्र असल्याची टीका डॉ. थोरात यांनी केली. दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिका अश्विनी देशपांडे यांनी भारतीय रेल्वेमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या अधिकारी, कर्मचारी तसेच उच्चवर्णिय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर संशोधन केले. त्यांनी विविध संशोधन आणि इंडिकेटर्सच्या माध्यमातून त्यांनी आरक्षणामुळे गुणवत्ता कमी होत नाही, उलट ती बाढते असा निष्कर्ष दिला. आरक्षण विरोधकांनी या सर्व बाबींचा प्रामाणिकपणे अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.