पूर्व विदर्भातील ७५ हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई
By admin | Published: April 11, 2016 03:08 AM2016-04-11T03:08:08+5:302016-04-11T03:08:08+5:30
राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत २०११ सालापासून पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यांतील सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
राष्ट्रीय पीक विमा योजना : ५ वर्षांत ३५ कोटींहून अधिक रकमेचे वाटप
नागपूर : राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत २०११ सालापासून पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यांतील सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३५ कोटींहून अधिक रकमेचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०१३-१४ पासून आकडेवारीमध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये पीकनिहाय मिळालेली नुकसानभरपाई, सदस्य इत्यादीसंदर्भात विचारणा केली होती. यासंदर्भात विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार २०११-१२ पासून रबी व खरीप हंगामासाठी या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला. गेल्या ५ वर्षात या योजनेंतर्गत ७४ हजार ७५२ शेतकऱ्यांना ३५ कोटी १६ लाख ७० हजार ५०० रुपयांच्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले. यात खरीप हंगामातील मदतीचे प्रमाण जास्त आहे. खरीप हंगामात ७३ हजार ३११ शेतकऱ्यांना ३४ कोटी ५१ लाख ५५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.(प्रतिनिधी)