स्पर्धा नको समन्वय हवा

By admin | Published: October 17, 2015 03:20 AM2015-10-17T03:20:50+5:302015-10-17T03:20:50+5:30

क्षमता असूनही काही महिलांना संधी नाकारली जाते, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही.

The competition does not want coordination | स्पर्धा नको समन्वय हवा

स्पर्धा नको समन्वय हवा

Next

‘लोकमत’ व्यासपीठ : विविध क्षेत्रातील महिलांनी व्यक्त केले मत
नागपूर : क्षमता असूनही काही महिलांना संधी नाकारली जाते, त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. महिलांनी स्वत:ला विविध क्षेत्रात सिद्ध केले असले तरी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र उपेक्षेचा आणि दुय्यमच आहे. महिलांच्या बाबतीत चांगली-वाईट संमिश्रता आहे.
वैचारिकदृष्ट्या सुशिक्षित महिलाही स्वतंत्र झालेल्या नाहीत. पत्नी यशस्वी झालेली हवी आहे पण ती स्वत:पेक्षा समोर गेलेली मात्र चालत नाही. यासाठी समाजाची मानसिकताच बदलणे गरजेचे आहे. स्पर्धा नव्हे स्त्री-पुरूषांमधला समन्वय विकसित होण्याची आवश्यकता असल्याचे मत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी शुक्रवारी व्यक्त केले. नवरात्रौत्सवानिमित्त ‘लोकमत’ने आयोजिलेल्या ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या उपक्रमांतर्गत सामाजिक क्षेत्रातील महिलांनी स्त्रीविश्वाचा वेध, बदलते स्वरूप आणि आव्हाने या विषयांवर विचारमंथन केले. (प्रतिनिधी)

स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करीत आहेत. त्यांच्यात काही करण्याची क्षमता आहे आणि इच्छाही पण त्यांना संधी मिळत नाही. स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी प्रामुख्याने आई महत्त्वाची भूमिका निभावू शकते. मुलांना वाढवितानाच त्यांच्यावर समानतेचा संस्कार केला तर पुरुषी मानसिकतेच्या प्रश्नामुळे स्त्रियांचे होणारे नुकसान सावरता येणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक आई सक्षम झाली पाहिजे.
-डॉ. सरिता मोवाडे
एस.एस. टेक्नोव्हिजन अँड इकोसोल्युशन

महिलांच्या शक्तीबद्दल समाजात बोलले जाते पण त्यांना स्थान मात्र दुय्यमच दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष स्थितीत तफावत आहेच. स्त्री सुशिक्षित असली तरी निर्णयक्षमतेचा अधिकार तिला नाही. पत्नी तिच्या क्षेत्रात यशस्वी असावी पण स्वत:पेक्षा समोर गेलेली आवडत नाही. समाजाला त्यासाठी वैचारिक बैठकच बदलावी लागेल. पालकांनी मुलांना समृद्ध करताना हा संस्कार बालपणापासून दिला तर समाजही बदलेल.
- डॉ. सीमा दंदे
प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ



प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी गुण असतात. त्या गुणांचा उपयोग करुन ती एखादा उद्योग उभारु शकते आणि आर्थिक बाबतीत सक्षम होऊ शकते. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यानेच तिच्या प्रगतीत बाधा येतात पण तिला व्यवसाय करण्याची संधी नाकारली जाते. त्यामुळे तिच्यातला आत्मविश्वास कमी होतो. अनेकदा सुशिक्षित स्त्रियांनाही नोकरी करण्यापासून मज्जाव केला जातो. हे थांबले पाहिजे.
-वंदना शर्मा, व्हीआयएच्या महिला विभाग अध्यक्ष

महिलांच्या बाबतीत विचार करताना ग्रामीण आणि शहरी स्त्रीचा वेगवेगळा विचार करावा लागेल. ग्रामीण भागात महिला स्वतंत्रपणे निर्णय घेताना दिसतात. पण अद्यापही काही निर्णय घेताना महिलांमध्ये विश्वास नसतो. काही निर्णय पुरुषांनीच घ्यावे, असे तिला वाटते. या स्थितीत बदल होत आहे आणि भविष्यात महिलाच वरचढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरुषांच्या तुलनेत नोकऱ्यांत आणि शिक्षणात मुलींचा टक्का वाढतो आहे. स्त्री म्हणून पाहण्यापेक्षा व्यक्ती म्हणून आपली दृष्टी विकसित केली पाहिजे.
- ज्योती पाटील, प्राचार्या रेणुका महाविद्यालय
 

Web Title: The competition does not want coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.