शाळेच्या अवाजवी शुल्काविरोधात करा तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:11 AM2021-08-14T04:11:29+5:302021-08-14T04:11:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना काळात शाळा बंद असतानाही मनमानी शुल्क वसूल करणाऱ्या शाळांवर नियंत्रण मिळविता यावे, यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात शाळा बंद असतानाही मनमानी शुल्क वसूल करणाऱ्या शाळांवर नियंत्रण मिळविता यावे, यासाठी शासनाने शुल्क विनियमनासाठी राज्यस्तरीय पुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना केली आहे. शुल्कवाढी विरोधात पालकांना नागपूर विभागीय शुल्क नियामक समितीकडे तक्रार करता येईल, असे शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांनी कळविले आहे.
खासगी शाळेच्या व्यवस्थापनाकडून पालकांना फीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर पालकवर्गाकडून येत होत्या शिक्षण विभागाने ७ जून रोजी अधिसूचनेद्वारे खासगी शाळाकडून मनमानी शुल्क आकारणीची दखल घेत नागपूरसह मुंबई, पुणे, नाशिक व औरंगाबाद येथे विभागीय नियामक समित्यांची स्थापना केली होती.
नागपूर विभागीय शुल्क नियामक समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. यात विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हे सदस्य आहेत. तर सनदी लेखापाल अक्षय गुल्हाने व सेवानिवृत्त शिक्षण संचालक चंद्रमणी बोरकर हे समितीचे सदस्य आहे. या समितीचे कार्यालय एनएमसी गार्डनजवळ, बालभारती कार्यालय धंतोली आहे. तसेच ई-मेल आयडी डिवायडीनागपूर ॲट रेडिफमेल डॉट कॉम असा आहे.