तक्रारकर्त्या महिलेला धमकी
By admin | Published: October 30, 2016 02:40 AM2016-10-30T02:40:52+5:302016-10-30T02:40:52+5:30
कचरा व सिवरेज लाईन तुंबल्याची तक्रार केल्यानंतर तातडीने दखल घेतली जाते, असा दावा महापालिकेतील पदाधिकारी करतात. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे.
पोलिसात तक्रार : आरोग्य विभागावर सभापतींचा वचक नाही
नागपूर : कचरा व सिवरेज लाईन तुंबल्याची तक्रार केल्यानंतर तातडीने दखल घेतली जाते, असा दावा महापालिकेतील पदाधिकारी करतात. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. जरीपटका भागातील अंगुलीमाल नगर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने घरासमोलील नाली तुंबल्याची झोन कार्यालयाकडे तक्रार केली म्हणून तिला चक्क जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
महापालिकेत कर्मचारी असलेल्या कमलाबाई हरिश्चंद्र पाटील एकट्याच राहतात. त्यांच्या घरापुढील नाली गेल्या काही महिन्यांपासून तुंबली आहे. यामुळे घाण वास येत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी मंगळवारी झोन कार्यालयाकडे तक्रार केली, परंतु याची दखल घेतली नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली. नगरसेवकांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेत नसल्याने शनिवारी पुन्हा झोन कार्यालयात तक्रार देण्यासाठी आल्या असता त्यांना सफाई कर्मचाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी या संदर्भात जरीपटका पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महापालिका कर्मचारी असलेल्या महिलेच्या तक्रारीची दखल आरोग्य विभागाकडून घेतली जात नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सभापतींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)
आरोग्य समिती कागदावरच
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या आरोग्य विभागाच्या कारभारावर नियंत्रण असावे, यासाठी आरोग्य समिती आहे. परंतु समितीचे सभापती देवेंद्र मेहर यांच्यासह अधिकाऱ्यांकडे कचरा व नाली तुंबल्याची तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही. सभापती निष्क्रिय असल्याची नागरिकांची तक्रार आहे. कमलाबाई पाटील यांनाही असाच अनुभव आला. सभापतीच नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याने आरोग्य समिती ही कागदावरचीच असल्याची महापालिकेत चर्चा आहे.