बी.एड.घोटाळ्याप्रकरणी पोलिसांत तक्रार
By admin | Published: February 4, 2016 02:50 AM2016-02-04T02:50:27+5:302016-02-04T02:50:27+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित बॅ.शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयात ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
२ कर्मचारी, २ माजी विभागप्रमुखांचा समावेश : शिक्षण क्षेत्रात खळबळ
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित बॅ.शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयात ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यासंदर्भात विभागप्रमुख डॉ.सुषमा शर्मा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अपहाराचा ठपका लावण्यात आलेल्या २ कर्मचाऱ्यांसोबतच २ माजी विभागप्रमुखांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहेत.
बॅ.शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयात २०१० ते २०१२ या तीन वर्षांत उच्च श्रेणी लिपिक प्रमोद देशपांडे व श्रीकांत पोलके यांनी विविध तारखांना ‘बेरर’ धनादेशाद्वारे संंबंधित रकमेची परस्पर उचल केली. या कालावधीत एकदाही त्यांच्या या व्यवहाराची तत्कालीन अधिकाऱ्यांनी पडताळणी केली नाही. शिवाय ही बाब समोर आल्यानंतर याचे ‘आॅडिट’देखील झाले नाही. काही महिन्यांअगोदर याची गंभीर दखल घेत ‘आॅडिट’ करण्यास सुरुवात करण्यात आली व या कालावधीत ४१ ते ४५ लाख रुपयाचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.
महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीची बैठक झाली असता त्यात यासंबंधात प्रश्न उपस्थित करण्यात आले व एकूणच कारभाराबाबत कुलगुरूंनी नाराजी व्यक्त केली. या समितीच्या बैठकीतच पोलीस तक्रार करण्याबाबत आग्रह धरण्यात आला होता. कुलगुरूंनी बैठकीच्या कार्यवृत्तावर स्वाक्षऱ्या केल्या व बुधवारी सायंकाळी विभागप्रमुखांना तातडीने पोलीस तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार डॉ.शर्मा यांनी रात्री अंबाझरी पोलीस ठाणे गाठले व पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. या अपहारात सहभागी असल्याचा ठपका असलेले उच्च श्रेणी लिपीक प्रमोद देशपांडे व श्रीकांत पोलके यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु नेमक्या कोणत्या २ विभागप्रमुखांचे यात नाव आहे, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. डॉ.शर्मा यांना संपर्क केला असता त्यांनी तक्रार दाखल केली असल्याचे स्पष्ट केले. परंतु इतर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.(प्रतिनिधी)