निराधार महिलेची न्यायासाठी आयुक्तांकडे तक्रार

By admin | Published: May 29, 2017 03:03 AM2017-05-29T03:03:14+5:302017-05-29T03:03:14+5:30

मालमत्ता हडपण्यासाठी छळ चालविणाऱ्या आरोपींना जरीपटका पोलीस पाठीशी घालत असल्यामुळे दहशतीत

Complaint against the Commissioner | निराधार महिलेची न्यायासाठी आयुक्तांकडे तक्रार

निराधार महिलेची न्यायासाठी आयुक्तांकडे तक्रार

Next

मालमत्तेसाठी छळ : आरोपींची पोलिसांकडून पाठराखण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालमत्ता हडपण्यासाठी छळ चालविणाऱ्या आरोपींना जरीपटका पोलीस पाठीशी घालत असल्यामुळे दहशतीत जगणाऱ्या एका निराधार महिलेने न्यायासाठी पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तृप्ती अजय कोथरे (वय ३३) असे पीडित महिलेचे नाव आहे. ती जरीपटक्यातील दयाल सोसायटीत राहते.
तृप्तीच्या तक्रारीनुसार, तिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तिला एक १४ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे. मिळेल तो कामधंदा करून ती स्वत:चा आणि मुलांचा उदरनिर्वाह करते. तृप्तींच्या सासऱ्यांची शेतजमीन होती. त्यांनी ती विकली आणि त्यातून आलेल्या रकमेचा आपल्या वारसांना हिस्सावाटप केले. हिस्सेवाटणीतून मिळालेल्या पैशातून अजय कोथरेंनी (तृप्तीचे पती) दयालनगर सोसायटीत घर बांधले. अजयचा मृत्यू झाल्यानंतर तृप्ती आणि तिच्या मुलांना या घरातून हुसकावून लावण्यासाठी आरोपी संदीप कोथरे (दीर) आणि रवी तायडे तसेच त्यांच्या नातेवाईकांनी तृप्ती व तिच्या मुलांचा छळ चालविला आहे. १४ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास आरोपी संदीप कोथरे, रवी तायडे आणि त्यांच्या साथीदारांनी तृप्ती व तिच्या मुलांवर हल्ला चढवला. तृप्तीच्या घराचे दार तोडून साहित्याची तोडफोड केली. तिला व मुलांना बेदम मारहाण करून तृप्तीसोबत लज्जास्पद व्यवहार केला. या घटनेची तक्रार तृप्तीने जरीपटका ठाण्यात दिली. प्रारंभी जरीपटका पोलिसांनी कारवाईसाठी मोठा जोश दाखवला. नंतर मात्र आरोपींची पाठराखण करून ‘नातेवाईकांचा आपसी वाद’अशी नोंद करीत तृप्तीची तक्रार अदखलपात्र (एनसी) केली. पोलिसांची साथ मिळाल्याने आरोपींकडून तृप्तीचा छळ वाढला आहे. तिच्या लहान मुलांनाही ते धमकावत आहेत. यामुळे तृप्ती व तिची मुले १० दिवसांपासून दहशतीत जगत आहेत. आपल्याला न्याय मिळावा म्हणून बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांची आयुक्तालयात तशी तक्रार दिली असून, न्यायाची अपेक्षा केली आहे.

आरोपी गुन्हेगारीवृत्तीचा
विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपी रवी तायडे हा गुन्हेगारीवृत्तीचा असून, त्याने गेल्या आठवड्यात यशोधरानगरातील वाहतूक व्यावसायिकावर आपल्या गुंडांच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवला होता. यशोधरानगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला जामीन मिळाला होता.

Web Title: Complaint against the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.