नवविवाहितेची सासरच्यांविरुद्ध तक्रार
By admin | Published: October 23, 2016 02:43 AM2016-10-23T02:43:06+5:302016-10-23T02:43:06+5:30
सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका महिलेने पतीविरुद्ध अनैसर्गिक अत्याचाराचा आणि सासरच्या मंडळीविरुद्ध छळाचा आरोप करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
पतीविरुद्ध बलात्काराचा आरोप : गणेशपेठमध्ये गुन्हा दाखल
नागपूर : सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका महिलेने पतीविरुद्ध अनैसर्गिक अत्याचाराचा आणि सासरच्या मंडळीविरुद्ध छळाचा आरोप करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
पीडित महिला (वय २३) परतवाडा येथील रहिवासी आहे. तिचे गणेशपेठेतील विश्वदीप जगदेव मनोहर (वय २८) याच्याशी एप्रिल २०१६मध्ये लग्न झाले. तो महापालिकेत काम करतो. लग्नाच्या काही दिवसानंतर विविध कारणावरून तिचे पती आणि सासरच्या मंडळीसोबत खटके उडू लागले. जूनमध्ये ती माहेरी गेली. त्यावेळी तिने तिकडच्या पोलिसांकडे तक्रार नोंदवली. नुकतेच लग्न झाल्यामुळे पोलिसांनी तिची समजूत काढून पतीकडे नांदण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ती सासरी परतली. त्यानंतर परत नवरा आणि सासरच्या मंडळीसोबत महिलेचे खटके उडू लागले. १७ जूनला ती माहेरी निघून गेली. शुक्रवारी ती माहेरच्या मंडळीसोबत गणेशपेठ ठाण्यात आली. ठाणेदार महेश चव्हाण यांची भेट घेऊन तिने तक्रार दिली. तक्रारीत गंभीर आरोप आहेत. पीडित महिलेला तिचा पती अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी छळत होता. त्याची सासरच्या मंडळीकडे तक्रार केली असता सासू सासरेही तिला शिवीगाळ करीत होते. माहेरहून पैसे आणि सोने आणावे म्हणून त्रास देत होते. तिची नणंद वर्धा येथे राहते. ती पीडित महिलेवर मांसाहार करण्यासाठी दबाव टाकत होती. दीर वाईट नजर टाकून मारहाण करीत होता, असे आरोप पीडित महिलेने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत लावले. त्यावरून पोलिसांनी विश्वदीप जगदेव मनोहर, जगदेव पांडुरंग मनोहर (वय ५६), ज्योती जगदेव मनोहर (वय ४८), गोविंद जगदेव मनोहर (वय २३) आणि उज्ज्वला राजेन्द्र मनोहर (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
दुसरी बाजू अंधारात
या प्रकरणाची दुसरी बाजू काय आहे, ते जाणून घेण्यासाठी गणेशपेठ ठाण्यात चौकशी केली असता पोलिसांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. आरोपांची गंभीरता लक्षात घेता या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचे ठाणेदार चव्हाण म्हणाले.