राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पाटील यांच्याविरुद्ध लुटमारीची तक्रार

By admin | Published: August 1, 2014 01:16 AM2014-08-01T01:16:01+5:302014-08-01T01:16:01+5:30

विद्यार्थी नेत्याला मारहाण करून रक्कम हिसकावल्याच्या आरोपाखाली सीताबर्डी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय पाटील, त्यांची पत्नी नगरसेविका प्रगती पाटील आणि अन्य आठ जणांविरुद्ध

Complaint against the NCP's City President, Patil | राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पाटील यांच्याविरुद्ध लुटमारीची तक्रार

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पाटील यांच्याविरुद्ध लुटमारीची तक्रार

Next

तक्रारकर्त्यांचा गोंधळ : सीताबर्डी ठाण्यात गुन्हे दाखल
नागपूर : विद्यार्थी नेत्याला मारहाण करून रक्कम हिसकावल्याच्या आरोपाखाली सीताबर्डी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय पाटील, त्यांची पत्नी नगरसेविका प्रगती पाटील आणि अन्य आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे, पोलिसांनी गुन्हे दाखल करावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनीच सीताबर्डी ठाण्यात गोंधळ घातला, हे विशेष!
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा शहराध्यक्ष शैलेंद्र गिरधारीलाल तिवारी याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, २७ जुलैला सायंकाळी ५.१५ वाजता तो देशपांडे सभागृहातील कार्यक्रमात नेत्यांसाठी बिसलरीचा बॉक्स घेऊन जात होता.
यावेळी शुभांकर पाटील, बंटी मुल्ला, पराग नागपुरे, शरद नागदिवे आणि राजेश कुंभलकर यांनी तिवारीला बाजूला खेचत नेले. त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्याच्याजवळचे तीन हजार रुपये हिसकावून घेतले. स्कॉर्पिओतून चाकू काढून आरोपींपैकी काही जण तिवारीला मारण्यासाठी धावले.
यावेळी शहराध्यक्ष अजय पाटील आणि नगरसेविका प्रगती पाटील यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात फसविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिवारीने तक्रारीत म्हटले आहे.
ही तक्रार नोंदविण्यासाठी तिवारी आपल्या साथीदारांसह आज दुपारी सीताबर्डी ठाण्यात पोहोचला. सत्तापक्षाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गंभीर आरोप असल्यामुळे पोलिसांनी त्याला टाळण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे तिवारी आणि साथीदारांनी ठाण्यात जोरदार नारेबाजी सुरू केली. महिला शहराध्यक्षा नूतन रेवतकर यासुद्धा घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी सीताबर्डीच्या ठाणेदाराची खरडपट्टी काढून गुन्हा दाखल करा, अन्यथा ठाण्यातच उपोषण करू, असा पवित्रा घेतला. प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळताच पोलिसांनी अजय पाटील यांच्यासह १० जणांवर गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)

Web Title: Complaint against the NCP's City President, Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.