सुश्रुत हॉस्पिटलविरोधात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:09 AM2021-04-28T04:09:14+5:302021-04-28T04:09:14+5:30
- तीन लाख डिपॉझिट मागितल्याचे प्रकरण : आरोग्य मंत्र्यांच्या निर्देशानुसार कारवाईची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोमवारी २६ ...
- तीन लाख डिपॉझिट मागितल्याचे प्रकरण : आरोग्य मंत्र्यांच्या निर्देशानुसार कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी २६ एप्रिल राेजी धरमपेठेतील निवासी अनिल करंडे (६६) यांच्यावर कोरोना संदर्भातील उपचार करण्यासाठी तब्बल तीन लाख रुपये डिपॉझिट मागितल्याप्रकरणी सिविक ॲक्शन गिल्ड फाऊंडेशनच्या वतीने रामदासपेठेतील सुश्रुत हॉस्पिटलविरोधात जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
सोमवारी धरमपेठेतील निवासी अनिल करंडे यांची प्रकृती अचानक खालावली असल्याने, त्यांचा मुलगा शिशिर त्यांना तत्काळ रामदासपेठ येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेला. मात्र, तेथे पोहोचताच रुग्णाची प्रकृती अत्यंत खालावली आहे. तेव्हा आम्ही त्यांना ॲडमिट करणार नाही. जर तुम्ही तीन लाख रुपये डिपॉझिट करत असाल तर ॲडमिट करू, अन्यथा आपल्या रुग्णाला तुम्ही परत घेऊ जा, अशी उद्दाम भाषा तेथील प्रशासनाकडून वापरण्यात आल्याचा आरोप शिशिर करंडे व सिटिझन्स ॲक्शन गिल्ड (सीएजी)चे सदस्य ॲड. अभय बांगडे यांनी लावला आहे. याबाबत सीएजीचे बांगडे यांच्यासह सिविक ॲक्शन गिल्ड फाऊंडेशन (सीएजीएफ) सहसचिव नितीन साठे व श्रीपाद इंदोलिकर यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे सुश्रुत हॉस्पिटलविरोधात तक्रार केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या निर्देशानुसार उपचाराच्या मोबदल्यात डिपॉझिट मागणाऱ्या हॉस्पिटलविरोधात कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
---------------
अशी कोणती विशेष सेवा दिली जाणार होती
जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत सुश्रुत हॉस्पिटल तीन लाख रुपये डिपॉझिट मागते आणि त्याच रुग्णाला बदर हॉस्पिटल २० हजार रुपयात ॲडमिट करते. कोरोना उपचाराचे सर्व पॅरामीटर्स सारखेच असताना, डिपॉझिट मागण्याचा हा फरक समजण्यापलीकडचा आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन ते कोणती अशी विशेष सेवा देणार होते. शिवाय, रुग्णावर उपचार की आधी पैसा, कर्तव्य कोणते, असे प्रश्न उपस्थित करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-----------------
डिपॉझिट मागितले नाही
शब्दांतून निर्माण झालेला हा गैरसमज आहे. रुग्ण अत्यवस्थ असून, आमच्याकडे व्हेंटिलेटर नसल्याचे मी सांगितले होते. तरी आम्ही रुग्णाला ॲडमिट करून घेण्याची तयारी दाखवली आणि उपचाराचा खर्च साधारणत: दोन ते तीन लाख रुपये येईल, असे सांगितले होते. विशेष म्हणजे, करंडे हे आमच्याकडे सीएजीच्या निर्मला वझे यांच्याच रेफरन्सने आले होते. आम्ही कधीच डिपॉझिट घेत नाही, घेतले नाही आणि घेणारही नाही. करंडे व सीएजी यांचा हा गैरसमज झालेला आहे.
- डॉ. सुश्रुत बाभूळकर, सुश्रुत हॉस्पिटल, रामदासपेठ
................