नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंबाबत राज्यपालांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:22 AM2019-09-16T11:22:51+5:302019-09-16T11:24:05+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियुक्त होऊनदेखील रुजू न होऊ शकलेल्या कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेवरून आता वातावरण तापले आहे. जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी यासंदर्भात थेट राज्यपालांकडेच तक्रार केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियुक्त होऊनदेखील रुजू न होऊ शकलेल्या कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेवरून आता वातावरण तापले आहे. जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी यासंदर्भात थेट राज्यपालांकडेच तक्रार केली आहे. डॉ. नीरज खटी यांचा ‘प्रोबेशन’ कालावधी पूर्ण झाला नसल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना होती. तरीदेखील त्यांची अगोदर निवड करणे व त्यानंतर त्यांना ‘लिन’ नाकारणे हा प्रक्रार करण्यात आला. यामुळे विद्यापीठाचा बहुमूल्य वेळ व पैसा वाया गेला आहे. या निवड प्रक्रियेचा पूर्ण खर्च कुलगुरूंकडूनच वसूल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कुलसचिवपदाच्या निवडीसाठी विद्यापीठात सात महिन्यांपासून प्रक्रिया सुरू होती. अखेर निवड समितीने डॉ. नीरज खटी यांची निवड केली. यानंतर प्रशासनावर राजकीय दबावदेखील आला. ‘लिन’ मिळू शकणार नसल्याने डॉ. खटी यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. कुलगुरूंना डॉ. खटी यांच्यासंदर्भात तांत्रिक बाबींची पूर्ण माहिती होती. अशास्थितीत निवड झाल्यानंतर हे मुद्दे कसे काय उपस्थित झाले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सुनील मिश्रा यांनी या मुद्यावरून कुलगुरूंचीच तक्रार राज्यपालांकडे केली आहे. डॉ. नीरज खटी यांची ‘लक्ष्मीनारायण इन्स्टिटयूट आॅफ टेक्नॉलॉजीह्णमध्ये रसायनशास्त्र विषयाचे प्रोफेसर म्हणून निवड करण्यात आली. ‘लिन’संदर्भातील नियमांची डॉ. खटी व डॉ. काणे या दोघांनाही माहिती होती. तरीदेखील त्यांचा अर्ज छाननी समितीने ग्राह्य धरला व त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. यानंतर त्यांची निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खुद्द कुलगुरू यांनीच निवड केली. नियुक्तीनंतर डॉ. खटी यांना ‘लिनह्ण नाकारून ते पद त्यांनी स्वीकारू नये, अशी व्यवस्था केली. यातूनच हा प्रकार जाणीवपूर्वक झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास तीन लाख रुपयांचा खर्च झाला. हा सर्व खर्च जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या निधीतून झाला आहे. त्यामुळे हा पैसा कुलगुरूंकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी मिश्रा यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही.