नागपुरातील नगरसेवक बंटी शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:37 AM2018-02-05T10:37:36+5:302018-02-05T10:42:33+5:30
कोतवाली पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह ६० ते ८० जणांच्या विरोधात कलम ३५३, मुंबई पोलीस अॅक्टअंतर्गत कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका सभागृहाचे कामकाज सुरू असताना आशा कार्यकर्त्या यांना चिथावणी देऊ न सभागृहात घुसण्यास प्रवृत्त क रून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह ६० ते ८० जणांच्या विरोधात कलम ३५३, मुंबई पोलीस अॅक्टअंतर्गत कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बंटी शेळके यांनी आशा कार्यकर्त्यांना सभागृहात घुसवून शासकीय कामकाजात अडथळा आणला होता. याची गंभीर दखल घेत आयुक्त अश्विन मुदगल यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार निगम सचिव हरीश दुबे यांनी शनिवारी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर रात्री शेळके यांच्याससह ६० ते ८० जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी सर्वसाधारण सभेत झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना अचानक आरोग्य विभागातील आशा कार्यकर्त्या पोलीस व सुरक्षा रक्षकांना न जुमानता सभागृहात घुसल्या. या गोंधळामुळे महापौर नंदा जिचकार यांना शनिवारी सर्वसाधारण सभेचे कामकाज स्थगित करावे लागले. शेळके यांनीच आशा कार्यकर्त्यांना सभागृहात घुसल्याचा आरोप आहे.
सभागृहाबाहेर आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनच्या बॅनरखाली आंदोलन करीत होते. मात्र शेळके यांनी आशा कार्यकर्त्यांना सभागृहात घुसण्याचा सल्ला दिला. त्यांना घेऊ न सभागृहाच्या गेटपुढे आले. तैनात सुरक्षा कर्मचाºयांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा रक्षकांना न जुमानता आशा कार्यकर्त्या बॅनर व झेंडे घेऊ न नारेबाजी करीत सभागृहात घुसल्या. मात्र शेळके येथून निघून गेल्याचा आरोप आहे. शेळके यांच्या या भूमिकेवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी बोलण्याचे टाळले. हा प्रकार योग्य नसल्याचे म्हटले तर सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.
सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू असताना सुरक्षा रक्षकांना न जुमानता आंदोलक सभागृहात घुसले. यामुळे कामकाजात बाधा निर्माण झाली. याची दखल घेत शनिवारी निगम सचिवांना संबंधितांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश दिले होते.
- अश्विन मुदगल, आयुक्त