नागपुरातील कचरा घोटाळ्याची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 09:24 PM2020-06-29T21:24:39+5:302020-06-29T21:25:59+5:30
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेले कंत्राटदार ट्रकमध्ये माती, दगड व वेस्ट मटेरियल आणून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये जमा करून महापालिकेची फसवणूक करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेले कंत्राटदार ट्रकमध्ये माती, दगड व वेस्ट मटेरियल आणून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये जमा करून महापालिकेची फसवणूक करतात. या ट्रक चालकांना रविवारी रंगेहात पकडले. यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या विरोधात पोलिसात तक्रार करणे अपेक्षित होते. परंतु ती केली नसल्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडे तक्रार करून, यासंदर्भात गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती आमदार विकास ठाकरे यांनी सोमवारी दिली.
ठाकरे यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्याशी चर्चा केली. कचºयाच्या ट्रकमध्ये माती व दगड, वेस्ट मटेरियल आणले जात असल्याचे पुरावे दिले. व्हिडिओ शूटिंग दाखविली. आज वाट बघितली परंतु सोमवारी रात्रीपर्यंत दोषी कंत्राटदारांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला नव्हता. मनपा प्रशासन चोराची पाठराखण करत आहे. दुसरीकडे सामान्य नागरिकांनी टॅक्स भरला नाही, अतिक्रमण केले, अनधिकृत बांधकाम केले तर तात्काळ कारवाई केली जाते. मग कंपनीवर महापालिकेचे अधिकारी इतके मेहेरबान कशासाठी, असा सवाल विकास ठाकरे यांनी केला आहे.
ट्रक चालकाने भांडेप्लॉट व यशस्वीनगर येथून जेसीबीच्या साह्याने ट्रकमध्ये माती व दगड भरल्याची कबुली दिली आहे. त्याचा जबाब रेकॉर्ड आहे. त्याचे व्हिडिओ शूटिंग आहे. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून संगनमताने सुरू आहे. दोन्ही कंपन्यांनी मागील आठ महिन्यात कचºयाऐवजी दगड, माती व वेस्ट मटेरियल भांडेवाडी येथे जमा करून कोट्यवधीचा घोटाळा केला आहे.
कारवाई न केल्यास आंदोलन
मनपा प्रशासनाला कचरा घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत. त्यानंतरही कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात नसेल तर या विरोधात आंदोलन करू, असा इशारा विकास ठाकरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना भेटणार
कचरा घोटाळ्यासंदर्भात मनपा प्रशासनाने दोषी कंत्राटदारांच्या विरोधात कुठलीही कारवाई न केल्यास यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करणार आहे. गृहमंत्र्यांना मंगळवारी भेटणार असल्याची माहिती विकास ठाकरे यांनी दिली.