मेट्रोत धांगडधिंगा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:08 AM2021-01-23T04:08:24+5:302021-01-23T04:08:24+5:30
नागपूर : बुधवारी मेट्रोच्या कोचमध्ये वाढदिवसाच्या नावाखाली धांगडधिंगा करून पैशांची उधळण करण्यात आली. एवढेच नव्हे तर जुगारही खेळण्यात आला. ...
नागपूर : बुधवारी मेट्रोच्या कोचमध्ये वाढदिवसाच्या नावाखाली धांगडधिंगा करून पैशांची उधळण करण्यात आली. एवढेच नव्हे तर जुगारही खेळण्यात आला. या घटनेची महामेट्रोने गंभीर दखल घेतली आहे. मेट्रोच्या कोचमध्ये अशोभनिय वर्तन करणाऱ्यांविरुद्ध महामेट्रोने शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
महामेट्रोने वाढदिवस, प्री वेडींग शूट, लग्नाचा वाढदिवस, हळदीकुंकु यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सेलिब्रेशन ऑन व्हिल्स ही योजना सुरु केली. त्यानुसार बुधवारी राहुल शिरभाते या व्यक्तीच्या वाढदिवसासाठी मेट्रो रेल्वेचे कोच बुक करण्यात आले. वाढदिवसाच्या नावाखाली संबंधित व्यक्तींनी सीताबर्डी ते लोकमान्यनगर प्रवासात तृतीयपंथींना सोबत नेऊन धांगडधिंगा केला. तृतीयपंथींवर पैसे उधळले. एवढेच नव्हे तर मेट्रोच्या कोचमध्ये जुगारही खेळण्यात आला. याबाबतच्या हे कृत्य महा मेट्रोला बदनाम करण्याचे षडयंत्र असून, कौटुंबिक जिव्हाळ्याच्या उपक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न असल्याचे महामेट्रोने तक्रारीत म्हटले आहे. हे कृत्य जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आल्यामुळे मेट्रोला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राहुल शिरभाते, राहुल कोल्हे, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. महामेट्रो अॅक्ट २००२च्या कलम ५९ आणि ६४, तसेच भादंविच्या कलम ३४, १४९, १८८, २६८ आणि जुगार कायद्याच्या कलम १३ नुसार कारवाई करण्याची मागणी महामेट्रोने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. सोबतच मेट्रोच्या कोचमध्ये करण्यात आलेला धांगडधिंगा आणि जुगार खेळल्याचे चित्रीकरणही सीताबर्डी पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. महामेट्रोच्या तक्रारीनंतर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
..........