रॅगिंगची तक्रार, चौकशीत सर्वांनी दिला नकार
By सुमेध वाघमार | Published: January 9, 2024 06:23 PM2024-01-09T18:23:53+5:302024-01-09T18:24:13+5:30
१८ डिसेंबर रोजी रँगिंगची निनावी तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाली.
नागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विद्यार्थ्याच्या रॅगिंगची निनावी तक्रार महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकला प्राप्त झाल्यानंतर नागपूर मेडिकलच्या अँटी रॅगिंग समितीने याची गंभीर दखल घेत चौकशी केली, परंतु सर्वच विद्यार्थ्यांनी नकार दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, १८ डिसेंबर रोजी रँगिंगची निनावी तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाली. तक्रार करणाऱ्याने नावाच्या जागी पलक एवढेच लिहिले. रॅगिंग घेणाऱ्याचे नावही लिहिलेले नाही. तक्रारीत, वसतिगृह क्रमांक ५ मध्ये नेहमीच रॅगिंग सुरू असल्याचे नमूद आहे. विद्यापीठाने ही तक्रार नागपूर मेडिकल कॉलेजकडे चौकशीसाठी पाठविली. येथील अँटी रॅगिंग समितीने तातडीने बैठक घेतली. यामध्ये विद्यार्थ्यांना बोलावून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान एकाही विद्यार्थ्याने रॅगिंग झाल्याचे सांगितले नाही. रॅगिंग कोणाशीही झाले असेल, तर ते तक्रार करण्यासाठी पुढे येऊ शकतात, असे समितीने म्हटले आहे. संबंधितांवर कारवाई करण्याचे व पीडितेचे नाव गोपनीय ठेवण्याचे आश्वासनही देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी रँगिंग झाली नसल्याचे लिहून दिले.
विद्यार्थ्यांचे करणार समुपदेशन
वसतिगृह क्रमांक ५ मधील २०२३च्या विद्यार्थ्यांचे बुधवारी अजनी पोलीस ठाण्याचे निरक्षक यांच्यासह वरीष्ठ डॉक्टर समुपदेशन करणार आहेत. यावेळीही कोणाची काही तक्रार असल्यास त्यांना बोलते केले जाण्याची शक्यता आहे.