'मेडिकल'मध्ये वरिष्ठ डॉक्टरच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार, समितीकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 11:19 AM2023-08-05T11:19:47+5:302023-08-05T11:21:44+5:30
घटनेने मेडिकल कॉलेजचे वातावरण ढवळून निघाले
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मनोविकृतीशास्त्र विभागातील एका वरिष्ठ डॉक्टरच्या विरोधात त्याच विभागातील एका महिला डॉक्टरनेलैंगिक छळाची लेखी तक्रार केल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन केली.
मेडिकलच्या मनोविकृतीशास्त्र विभागात हाऊस ऑफिसर म्हणून सहा महिन्यांच्या कंत्राटावर एक महिला डॉक्टर कार्यरत आहे. या महिला डॉक्टरने मंगळवारी अधिष्ठाता कार्यालय गाठून आपल्याच विभागातील एका वरिष्ठ डॉक्टरच्या विरोधात लैंगिक छळाची तोंडी तक्रार केली. अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी त्या महिला डॉक्टरला लेखी तक्रार देण्यास सांगितले. लेखी तक्रार प्राप्त होताच डॉ. गजभिये यांनी चार सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने शुक्रवारपासून चौकशीला सुरूवात केली.
- कपडे पाहून करायचा शेरेबाजी
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वरिष्ठ डॉक्टर कपड्यांना घेऊन त्या महिला डॉक्टरवर शेरेबाजी करायचे. कारण नसताना आपल्या केबिनमध्ये बसवून ठेवायचे. यापूर्वीही त्यांनी काही निवासी महिला डॉक्टरांवर अशा स्वरुपाची शेरेबाजी केल्याचे समजते. तक्रारकर्ता महिलेला सौम्य प्रकारचा मानसिक आजार असल्याचेही बोलले जाते.
निवासी डॉक्टरांकडून विचारपूस
शुक्रवारी चौकशी समितीने दुपारी मनोविकृतीशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व काही निवासी डॉक्टरांची विचारपूस करून त्यांचे म्हणणे नोंदवून घेतले. पुढील तीन ते चार दिवसात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. या घटनेने मेडिकल कॉलेजचे वातावरण ढवळून निघाले आहे. तूर्तास कोणी यावर अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही. समितीचा अहवाल आल्यावरच बोलू असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.