तक्रारकर्त्यालाच अर्ज केला परत
By admin | Published: December 29, 2014 02:40 AM2014-12-29T02:40:35+5:302014-12-29T02:40:35+5:30
माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेली माहिती टाळण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करतात, ही नेहमीचीच ओरड आहे.
नागपूर : माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेली माहिती टाळण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करतात, ही नेहमीचीच ओरड आहे. परंतु माहिती मागवण्यासाठी कार्यालयात पोस्टाने पाठविण्यात आलेला एखादा अर्ज सरसकट परत पाठविण्याचा प्रकारही आता नागपुरात सुरू झाला आहे. महापालिकेतील आरोग्य विभागाशी संबंधित एका प्रकरणावरून तर असेच दिसून आले आहे.
कृष्णकुमार दाभोळकर हे शहरातील एक प्रसिद्ध माहिती अधिकारी कार्यकर्ते आहेत. तसेच आम आदमी पार्टीचे ते सक्रिय कार्यकर्तेसुद्धा आहेत. नागरिकांच्या हिताच्या संबंधात ते शहरातील विविध शासकीय कार्यालयांमधून विविध प्रकारची माहिती मागवीत असतात. शहरातील आरोग्यविषयक समस्येबाबत त्यांनी महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला.
यामध्ये मनपा आरोग्य उपसंचालकांना १६ सप्टेंबर रोजी घरोघरी कचरा उचलण्याबाबत, ७ सप्टेंबर रोजी कचरा जाळण्यास प्रतिबंध घालण्याबाबत, १७ नोव्हेंबर रोजी स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने फेरीवाले, दुकानदारांना कचरा डस्टबिनमध्ये टाकण्यात सक्ती करण्याबाबत आणि स्वच्छतेचे काम सांभाळणाऱ्या एजन्सीच्या सफाई कामगारांना डायऱ्या देण्याबाबत निवेदन दिले होते.
परंतु त्यांच्या एकाही निवेदनाला अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. आपल्या पत्राबाबत नेमके काय झाले, याची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करण्याचे ठरविले. त्यानुसार दाभोळकर यांनी आरोग्य विभागाकडे १७ डिसेंबर रोजी अर्ज सादर केला. हा अर्ज त्यांनी स्पीड पोस्टाने पाठविला. जन माहिती अधिकारी तथा झोनल अधिकारी (मुख्यालय) नागपूर महानगरपालिका सिव्हिल लाईन्स नागपूर या नावाने पाठविण्यात आलेला अर्ज दुसऱ्या दिवशी अर्जकर्त्याकडेच ‘रिफ्यूज’ म्हणून परत आला.
माहिती देण्यास टाळाटाळ करण्यासाठीच हा प्रकार करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)