समाधान शिबिरात तक्रारींचा पाऊस

By admin | Published: February 15, 2016 03:13 AM2016-02-15T03:13:58+5:302016-02-15T03:13:58+5:30

महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना नागपूरला हेलपाटे मारावे लागतात. यासाठी संपूर्ण प्रशासनच गावात आणून लोकांच्या तक्रारी ...

Complaints of complaints in the solution camp | समाधान शिबिरात तक्रारींचा पाऊस

समाधान शिबिरात तक्रारींचा पाऊस

Next

पालकमंत्र्यांसह अधिकारी बेल्यात दाखल : सात हजार नागरिकांना दिलासा
बेला : महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना नागपूरला हेलपाटे मारावे लागतात. यासाठी संपूर्ण प्रशासनच गावात आणून लोकांच्या तक्रारी आणि समस्या सोडविण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जिल्ह्यातील प्रत्येक मतदार क्षेत्रात अशा शिबिराचे आयोजन होणार असून ५० लाख नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचणार आहेत, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. या शिबिरात सात हजार नागरिकांनी सहभाग नोंदवून समस्या मांडल्या. त्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
उमरेड तालुक्यातील बेला येथे आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे बोलत होते. प्रारंभीपासूनच हजारो नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. या समस्या व तक्रारी सोडविण्यात येतील, असे बोलताना, शासन आपल्या दारात आले आहे. शासनाच्या योजना स्वीकारा आणि लाभ घ्या, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामस्थांना केले.
शिबिराला आ. सुधीर पारवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषद सदस्य जयकुमार वर्मा, आनंद राऊत, शालू मेंढुले, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शेरखाने, सरपंच सुभाष तेलरांधे, उपसभापती गोविंद इटनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, आस्तिक सहारे, श्याम दुबे, तहसीलदार चंद्रभान खंडाईत, गटविकास अधिकारी राठोड आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
१५ दिवसांपूर्वी १३ ग्रामपंचायतींमधील लोकांच्या समस्या प्रशासकीय यंत्रणेने जमा करून या शिबिरात ठेवल्या. शिबिराच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व सीईओ जोंधळे यांच्या संपूर्ण टीमचे पालकमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. वरिष्ठ अधिकारी जनतेपर्यंत गेले, सामान्यांच्या अडचणींची त्यांना माहिती होईल आणि शासनाच्या योजनाही जनतेपर्यंत पोहोचणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आपण स्वत: असे तीन मंत्री जिल्ह्यास लाभले आहेत. विकास कामे करून घेण्यास या संधीचा फायदा घ्यावा. आतापावेतो दोन हजार कोटी रुपये नितीन गडकरींनी जिल्ह्याला दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी विविध भागातील १ हजार ७५० विविध प्रमाणपत्र तयार केले असल्याची माहिती दिली. या प्रमाणपत्रांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एक टोल फ्री नंबर दिला जाईल. त्यात ७/१२ प्रमाणपत्रे, फेरफार आदीसाठी या टोल नंबरचा उपयोग जनतेला करता येईल. यासाठी नागपुरात येण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Complaints of complaints in the solution camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.