नागपुरात वाढत्या वीज बिलांमुळे तक्रारी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:14 PM2020-06-30T23:14:25+5:302020-06-30T23:16:26+5:30
मार्च महिन्यानंतर जूृन महिन्यामध्ये आलेल्या वीज बिलांसंदर्भात तक्रारींमध्ये बरीच वाढ झाली आहे. मंगळवारी महावितरणच्या ‘वेबिनार’मध्ये अगदी काही तासातच ५१५ ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या. तर कंपनीच्या कार्यालयामध्ये असलेल्या तक्रार निवारण केंद्रामध्येही तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च महिन्यानंतर जूृन महिन्यामध्ये आलेल्या वीज बिलांसंदर्भात तक्रारींमध्ये बरीच वाढ झाली आहे. मंगळवारी महावितरणच्या ‘वेबिनार’मध्ये अगदी काही तासातच ५१५ ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या. तर कंपनीच्या कार्यालयामध्ये असलेल्या तक्रार निवारण केंद्रामध्येही तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
सध्या महावितरण कंपनीच्या प्रत्येक कार्यालयामध्ये ५०० च्या वर नागरिक तक्रारी घेऊन पोहचत आहेत. अपेक्षेपेक्षा अधिक बिल आल्याच्या अनेकांच्या तक्रारी असून, हे बिल कमी करण्याची मागणी होत आहे. तर, या बिलांमध्ये कसलीही त्रुटी नसल्याचे महावितरण सांगत आहे. नागपूर विभागीय मंडळाच्या कार्यालयाकडून ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी मंगळवारी एका वेबिनारचे आयोजन केले होते. प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उपमहाव्यवस्थापक प्रमोद खुले, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर उपस्थित होते. व्यवस्थापक विकास बांबल यांनी बिलांशी संबंधित विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. कंपनीने वादविवाद टाळण्यासाठी फक्त लेखी तक्रारींवरच चर्चा केली. ग्राहकांना बोलण्याची संधीच दिली नाही. दुसरीकडे कंपनीच्या कार्यालयाकडूनही टोकन देऊन ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात आहेत. या कार्यालयांमधून दिवसभरात साधारणत: ५०० च्या जवळपास टोकन वाटले जात आहेत.
अनेक ठिकाणी मेळावे
ग्राहकांची बाजू समजून घेण्यासाठी अनेक ठिकाणी वितरण कंपनीचे मेळावे घेतले. हुडकेश्वर उपविभागांतर्गत हुडकेश्वर खुर्द, सालई गोधनी, पिपळा, सरसोली, चिकना, धामणा येथे मेळावे झाले. पिपळाृ घोगली येथील मेळाव्यामध्ये १०३ ग्राहकांनी तक्रारी ऐकल्या. कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे यांनी उमरेड पंचायत समिती सभागृहात सभापती, सदस्य आणि अधिकाऱ्यांना बिलासंदर्भात माहिती दिली.
आजपासून उपविभागस्तरावर वेबिनार
ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी १ जुलैपासून उपविभाग कार्यालयाच्या स्तरावर वेबिनार आयोजित केले जाणार आहेत. मानेवाडा उपविभागात ग्राहकांसाठी २ जुलैला सकाळी ११ वाजता वेबिनार होईल. याचप्रकारे ग्रामीणमधील ग्राहकांसाठीही २ जुलैपासून वेबिनार होतील. पहिल्या दिवशी काटोलमधील ग्राहकांच्या तक्रारी ऐकल्या जातील.