सकाळी तक्रार, दुपारी हत्या - कारवाई टाळल्याचा दुष्परिणाम

By admin | Published: October 4, 2016 12:30 PM2016-10-04T12:30:40+5:302016-10-04T12:30:40+5:30

आरोपीविरुद्ध आलेली तक्रार पोलिसांनी अदखलपात्र ठरवल्यानंतर त्याच आरोपीने फिर्यादीची हत्या केल्याची घटन नागपूरमध्ये घडली.

Complaints in the morning, murder in the afternoon - side-effects of avoiding action | सकाळी तक्रार, दुपारी हत्या - कारवाई टाळल्याचा दुष्परिणाम

सकाळी तक्रार, दुपारी हत्या - कारवाई टाळल्याचा दुष्परिणाम

Next
नरेश डोंगरे, ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ४ -  आरोपीविरुद्ध आलेली तक्रार पोलिसांनी अदखलपात्र ठरवल्यानंतर त्याच आरोपीने फिर्यादीची हत्या केल्याची घटन नागपूरमध्ये घडली. ईमामवाड्यातील दिनेश शर्माच्या हत्येनंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.  या धक्कादायक घटनाक्रमामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
उपराजधानीतील गुन्हेगारी उफाळल्याने सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरली आहे. तर, शहर पोलीस दलातील वरिष्ठात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शहरात गुंडांचे नव्हे तर कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य असावे, अशी भूमिका पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि सहआयुक्त संतोष रस्तोगी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिका-यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंडगिरी ठेचून काढा, असे कडक निर्देश वरिष्ठ पातळीवरून सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे. गुन्हेगारांविरुद्ध आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्याचेही सूचविण्यात आले आहे. मात्र,  अनेक पोलीस ठाण्यातील मंडळीवर वरिष्ठांच्या निर्देशाचा फारसा परिणाम झालेला नाही, असे धक्कादायक वास्तव इमामवाड्यातील हत्या प्रकरणातून पुढे आले आहे. एवढेच नव्हे तर दिनेश शर्माच्या हत्येला इमामवाडा पोलिसांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचेही उघड झाले आहे.  
 आरोपी अक्षय मेश्राम याने  एका व्यक्तीला सोमवारी सकाळी मारहाण केली होती. दिनेश शर्माने त्या व्यक्तीला इमामवाडा ठाण्यात जाऊन तक्रार देण्यासाठी प्रोत्साहित केले होते. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेतली नाही. तक्रारकर्त्याच्या हातात एन.सी. (अदखलपात्र) ची पावती देऊन त्याला ठाण्यातून रवाना केले. दुसरीकडे आरोपी अक्षय मेश्रामला आपल्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार आल्याचे आणि ती देण्यासाठी दिनेश शर्मानेच बाध्य केल्याचे कळले. पोलिसांकडून कारवाई न झाल्यामुळे निर्ढावलेल्या आरोपीने दिनेश शर्माला ममताच्या घरात पकडले. सकाळी तू माझ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार पाठविली. त्याचा परिणाम भोगण्यास तयार हो, असे म्हणत त्याने दिनेशला चाकूने भोसकले. तुझी हत्या केली तरी आपले काही बिघडणार नाही, असे तो यावेळी बोलत होता, असेही प्राथमिक तपासात उघड झाल्याचे समजते. एका वरिष्ठ अधिका-यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
-
 दिनेशच्या घरी जाऊन सांगितले
आरोपी मेश्राम एवढा निर्ढावला होता की त्याने दाटीवाटीच्या वस्तीत अनेकांसमोर दिनेशची हत्या केली आणि तो दिनेशच्या घरी गेला. आपण दिनेशची हत्या केली, त्याचा मृतदेह पडून आहे, असे त्याने दिनेशच्या घरच्यांना सांगितले. ते ऐकून आधी दिनेशच्या घरच्यांनाही तो दारूच्या नशेत बरळत असावा, असे वाटले. मात्र तो खरे बोलत असल्याचे उघड झाल्यानंतर दिनेशच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. 
 
जानेवारी ते सप्टेंबर ६० हत्या
 गेल्या आठ दिवसात शहरात घडलेली हत्येची ही तिसरी घटना आहे. तर, जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत हत्येच्या ६० घटना घडल्या. गेल्या वर्षी हा आकडा ४७ एवढा होता. अर्थात यंदा गेल्या ९ महिन्यात १३ घटनांची वाढ झाली आहे. हत्येच्या प्रयत्नांच्या ५५ घटना घडल्या. या आकडेवारीतून नागपुरातील गुन्हेगारी उफाळल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी असाच हलगर्जीपणा सुरू ठेवल्यास या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 

 

Web Title: Complaints in the morning, murder in the afternoon - side-effects of avoiding action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.