जिल्हा न्यायालयचे बांधकाम डिसेंबरपूर्वी पूर्ण करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:11 AM2021-08-21T04:11:04+5:302021-08-21T04:11:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम डिसेंबरपूर्वी पूर्ण करा, अशी सूचना पालकमंत्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम डिसेंबरपूर्वी पूर्ण करा, अशी सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली. शुक्रवारी सिव्हिल लाईन्स येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करताना ते बोलत होते.
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, उपअभियंता चंद्रशेखर गिरी, शाखा अभियंता राजेंद्र बानाईत, राजेंद्र बारई तसेच न्यायालयाचे अधिवक्ते, अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
इमारतीच्या बांधकामामध्ये सौरऊर्जेचा वापर करण्यात यावा. तसेच बांधकाम करताना अत्याधुनिक एलईडी दिव्यांची यंत्रणा बसविण्यात यावी. संपूर्ण बांधकामामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. न्यायाधीशांच्या कक्षेप्रमाणेच अभिवक्त्यांच्या कक्षेमध्येही वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात यावी. तसेच याबाबतचा प्रस्ताव सोमवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.
बॉक्स
- अशी आहे नवीन इमारत
जिल्हा न्यायालयाची नवी इमारत दहा मजली आहे. तळमजला, पहिला आणि दुसरा मजला वाहनतळासाठी राखीव आहे. तिसऱ्या मजल्यावर कार्यालय, उपाहारगृह तसेच तात्पुरते तुरुंग आहे. चौथ्या व आठव्या मजल्यापर्यंतच्या पाचही मजल्यांवर कोर्ट हॉल आहे. एकूण २५ कोर्ट हॉल्स आहेत. नवव्या मजल्यावर प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे न्यायालय आहे. इमारतीच्या बांधकामाला जानेवारी, २०१७ पासून सुरुवात झाली असून, आतापर्यंत ८० कोटी रुपये खर्च झाले. आणखी २१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. न्यायालय परिसरात असलेल्या पुरातत्त्व इमारतीचे जतन करून त्या इमारतीला अनुरूप नवीन इमारतीलाही देखणेपण देण्यात येत आहे. जेणेकरून परिसरातील सौंदर्यात भर पडेल. जुनी इमारत नवीन इमारतीशी तिसऱ्या व चौथ्या माळ्यावर जोडण्यात आली आहे.