अधिवेशनाच्या तयारीची कामे दोन दिवसात पूर्ण करा : डॉ. संजीव कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 09:53 PM2019-12-06T21:53:17+5:302019-12-06T21:53:57+5:30
मुख्यमंत्र्याचे निवासस्थान रामगिरी, हैद्राबाद हाऊस, देवगिरी तसेच इतर व्यसस्थेसंदर्भातही सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केलेली कामे येत्या दोन दिवसात पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी निवास व्यवस्थेसह विविध मंत्रालयीन विभागासाठी दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने करावयाच्या व्यवस्थेबाबत सर्व विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवून दिलेली संपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावी. तसेच मुख्यमंत्र्याचे निवासस्थान रामगिरी, हैद्राबाद हाऊस, देवगिरी तसेच इतर व्यसस्थेसंदर्भातही सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केलेली कामे येत्या दोन दिवसात पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.
हिवाळी अधिवेशनासाठी आमदार निवास, विधानभवन, रविभवन येथील निवास व्यवस्था तसेच हैद्र्राबाद हाऊस येथील विविध विभागांच्या कार्यालय व्यवस्थेबाबत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर विभागप्रमुखांच्या बैठकीत कामांचा आढावा घेतला. त्याप्रसंगी डॉ. संजीव कुमार बोलत होते. आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी रविंद्र्र ठाकरे, अधीक्षक अभियंता व्ही.डी. सरदेशमुख, भारत संचार निगमचे वाणिज्य अधिकारी संतोष सुरपाटणे, पोलीस उपायुक्तश्वेता खेडकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपायक्त मिलींद साळवे, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, उपायुक्त के.एन.के. राव, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, रविंद्र कुंभारे, मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र्र खजांजी आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशन येत्या १६ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशननिमित्त करावयाच्या विविध व्यवस्थेचा आढावा विभागीय आयक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभाग व विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यातर्फे निवासाची व्यवस्था करण्यात येते. निवासव्यवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उपलब्ध व्यवस्था तसेच निवासासाठी करावयाची कार्यवाही यासंदर्भात अहवाल तयार करण्याच्या सूचना देताना विभागीय आयुक्त म्हणाले की, विधानमंडळाचे सभापती, अध्यक्ष, उपसभापती, विरोधी पक्षनेते तसेच मंत्री मंडळातील सदस्यांसाठी रविभवन येथील कुटीर आदीबाबत व्यवस्थेची पुस्तिका तयार करण्यात यावी व त्यानुसार मंजुरी घेवून व्यवस्था अंतिम करावी. सुयोग येथे पत्रकारांसाठीची निवास व्यवस्था तसेच अधिवेशन काळात भेट देणाऱ्या अतिथींसाठी आवश्यक व्यवस्था पूर्ण करावी.
वाहन व्यवस्थेसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करा
अधिवेशन काळात करावयाची वाहन व्यवस्था करताना विभागातून तसेच विभागाबाहेरील शासकीय वाहने अधिग्रहित करणे तसेच शासकीय वाहने वितरित करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा. अधिवेशनासाठी अतिरिक्त वाहनांची आवश्यकता भासल्यास कंत्राटी पध्दतीने वाहन पुरविण्यासाठी शासनाच्या विहीत नियमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. अधिवेशनासाठी २७१ दूरध्वनीचा वापर करण्यात येतो. दूरध्वनी व्यवस्था अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सुरळीत सुरु व्हावी यादृष्टीने संपर्क अधिकाऱ्याने नियोजन करावे. नागपूर अधिवेशनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखताना आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबतही विभागीय आयुक्त यांनी सूचना केल्यात.