१० जूनपूर्वी नदी स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा : महापौरांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:41 AM2019-05-29T00:41:27+5:302019-05-29T00:42:21+5:30
कुठलीही अतिवृष्टी आली तरी शहरात पाणी साचायला नको. यासाठी शहरातील चेंबर, नाल्या, पावसाळी नाल्या आणि नद्या स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन वाढवा आणि १० जूनपूर्वी नदी, नाले स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुठलीही अतिवृष्टी आली तरी शहरात पाणी साचायला नको. यासाठी शहरातील चेंबर, नाल्या, पावसाळी नाल्या आणि नद्या स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन वाढवा आणि १० जूनपूर्वी नदी, नाले स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा, असे निर्देश महापौरनंदा जिचकार यांनी दिले.
पावसाळापूर्व तयारी आणि नदी स्वच्छता अभियानाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने मनपा मुख्यालयात महापौरनंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजित बांगर, आ. कृष्णा खोपडे, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते.
महापौर जिचकार आणि आयुक्त बांगर यांनी यावेळी सर्वप्रथम नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी स्वच्छता अभियानाचा टप्पानिहाय आढावा घेतला. ज्या टप्प्याचे काम अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे तेथे कामाचे तास वाढवून कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश महापौर जिचकार यांनी दिले. मागील पावसाळ्यात पावसाचे पाणी शहरात साचले. ते वाहून जाण्यात अडथळा आल्यानेच गंभीर परिस्थिती उद्भवली होती. यावर्षी तसे होणार नाही, यासाठी पूर्वीपासूनच नियोजन करावे. मेट्रोच्या अखत्यारित असलेले कार्य तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यासाठी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
काम पूर्ण झाल्यावर नगरसेवकांचे पत्र घ्या
नदी स्वच्छता अभियानांतर्गत नदीतून माती काढल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ती नदीपात्रातच ठेवण्यात आली आहे. ती माती तेथून काढून इतरत्र टाकण्यात यावी, असे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. शहरातील पावसाळी नाल्या, चेंबर, नाले स्वच्छ करण्याचा वेग वाढविण्यात यावा आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन ती कामे पूर्ण करावीत. काम पूर्ण झाल्यानंतर नगरसेवकाचे पत्र घ्यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी सर्व संबंधित सहायक आयुक्तांनी नाले, पावसाळी नाल्या, चेंबर सफाईचा गोषवारा मांडला.