कोराडी मंदिर परिसरातील कामे नवरात्रीपूर्वी पूर्ण करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:27+5:302021-06-09T04:08:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर परिसरातील विकास कामे येत्या नवरात्रीपूर्वी पूर्ण करा, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर परिसरातील विकास कामे येत्या नवरात्रीपूर्वी पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी दिले.
पालकमंत्री राऊत यांनी कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री व कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर महानगर विकास प्राधिकरण सभापती मनोज सूर्यवंशी उपस्थित होते. महानिर्मिती, महापारेषण, महाऊर्जातर्फे मंदिर परिसरात विविध विकास कामे प्रगतिपथावर आहेत. कोराडी मंदिर परिसरातील विविध इमारतींवर सौर ऊर्जेचे संच उभारण्यात येणार आहे. यातून १,१६८ किलोवॅट ऊर्जेची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प २५ वर्षांसाठी असून यातून ३.४७ कोटी युनिट विजेची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज खरेदी करण्याच्या संदर्भात यावेळी राऊत यांनी महालक्ष्मी जगदंबा मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांशीसुद्धा चर्चा केली. मंदिर परिसरात होणाऱ्या विकास कामांचे उद्घाटन येत्या नवरात्रीत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्य अभियंते राजेश कराडे, राजेश पाटील, राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर, राजू घुगे, वास्तुशिल्पी अशोक मोखा, महाऊर्जा प्रादेशिक अधिकारी वैभव पाथोडे, नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्य अभियंता नीला उपाध्ये, जिल्हा परिषदेचे सदस्य नाना कंभाले, मंगेश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
बॉक्स
नारा परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटणार
उत्तर नागपूर नारा परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट करावी लागत होती. नारा परिसरात प्रभाग १ च्या वेलकम सोसायटी आणि प्रभाग ४ च्या शनि मंदिर, कलमना परिसरात पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते; परंतु टाकीकरिता पाण्याची लाईन चार्ज नसल्याने येथील नागरिकांना कृत्रिम पाण्याची टंचाई सहन करावी लागत होती. नागरिकांच्या तक्रारीवर सोमवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना १५ जुलैपर्यंत सदर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.