दक्षतेतून समतेचा संदेश

By admin | Published: October 24, 2015 03:24 AM2015-10-24T03:24:46+5:302015-10-24T03:24:46+5:30

नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली अन् पोलीस सतर्क असले तर गुन्हेगार कितीही मोठा असू दे, तो माशी मारण्याचीही हिंमत दाखवणार नाही.

Comprehensive message of commitment | दक्षतेतून समतेचा संदेश

दक्षतेतून समतेचा संदेश

Next

कसला गोंधळ नाही : कोणता गैरप्रकारही नाही
नागपूर : नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली अन् पोलीस सतर्क असले तर गुन्हेगार कितीही मोठा असू दे, तो माशी मारण्याचीही हिंमत दाखवणार नाही. पवित्र दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमातून त्याची प्रचिती आली. देशविदेशातून लाखोंच्या संख्येत नागपुरात लोक आले. मात्र, गंभीर गुन्हा तर सोडा साधा खिसा कापण्याचाही गैरप्रकार या भागात घडला नाही. पोलिसांचा नियोजनपूर्वक बंदोबस्त अन् नागरिकांची सतर्कता या दोहोंमुळेच हे शक्य झाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा संदेश देशभर देण्यासाठी पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो अनुयायी जमतात. यावर्षीही ते आले. विदेशातून मान्यवर पाहुणे आले असतानाच बाबासाहेबांच्या भूमीवर डोके टेकवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आबालवृद्धही आले. त्यात उच्चशिक्षितांसोबत निरक्षरांचाही समावेश होता. महानगरात मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांपासून तो गावखेड्यात वर्षभर कबाडकष्ट करणाऱ्यांचाही त्यात समावेश होता. श्रीमंत, मध्यमवर्गीय गरीब, अतिगरीब अशा सर्वच वर्गातील ही मंडळी होती. येथे ते कुणाच्या नेतृत्वात येण्याचा अथवा कुणी त्यांना आणण्याचाही प्रश्न नव्हता. बाबासाहेबांच्या प्रेरणेने ते स्वयंस्फूर्तीने, स्वखर्चानेच येथे आले होते. त्यांच्या स्वयंशिस्तीचे, स्वाभिमानाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नागपुरातील आपल्या दीड-दोन दिवसाच्या वास्तव्यात त्यांनी कुणाशी वाद घातला नाही. कुणी गोंधळ केला नाही. आपल्या जबाबदारीचे भान राखताना त्यांनी आजूबाजूच्यांची गैरसोय होणार नाही, त्याचीही दखल घेतली. बालकं, वृद्ध, निरक्षरांची काळजी घेतली. त्यांना मदतीचा हात दिला. त्यांच्या औषधापासून त्यांना गावाला जाण्यासाठी कुठून, कधी, कोणते साधन आहे, त्याबाबत मार्गदर्शनही केले.
म्हणतात की, गर्दीत हौसे, नवसे, गवसेही असतात. मात्र, येथे केवळ बाबासाहेबांचे सच्चे अनुयायीच असल्यामुळे कुणा चोर-भामट्याला चोरी, उचलेगिरी करण्याची संधीच मिळाली नाही. त्याचमुळे दीक्षाभूमी आणि आजूबाजूच्या परिसरात लाखोंची गर्दी असूनही कुणाची बॅग चोरीला गेली नाही. कुणाचा खिसा कापला गेला नाही. कुणाचा दागिना हिसकावला गेला नाही. कुणाचा कुणासोबत वाद, हाणामारी झाली नाही. बाबासाहेबांच्या विचाराने संस्कारित झालेल्या या भीमसैनिकांनी त्यांच्या सहकार्यासाठी असलेल्या सुरक्षा यंत्रणांच्या कोणत्या घटकासोबत वादही घातला नाही अन् कुरबुरही केली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Comprehensive message of commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.