भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास व्हावा; मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:30 AM2019-03-01T11:30:52+5:302019-03-01T11:31:16+5:30

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास करून त्याला नवचेतना दिली पाहिजे. भगवद्गीतेत तर मनाची ‘पॅथालॉजी’च मांडली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

Comprehensive study of Indian psychology; Mohan Bhagwat | भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास व्हावा; मोहन भागवत

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास व्हावा; मोहन भागवत

Next
ठळक मुद्देभगवद्गीतेत मांडली आहे मनाची ‘पॅथालॉजी’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संस्कृतीत मनासंबंधी सखोल विचार झाला आहे. पाश्चात्य मानसशास्त्राच्या संशोधनाबाबत चर्चा होताना दिसते. मात्र आपल्या देशातील मानसशास्त्रात वेगळी दृष्टी होती. आपल्या परंपरेत मनाचा विचार वैज्ञानिक पद्धतीने झाला आहे. त्यामुळे भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास करून त्याला नवचेतना दिली पाहिजे. भगवद्गीतेत तर मनाची ‘पॅथालॉजी’च मांडली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड लिखित ‘मन आणि आपण’ या पुस्तकाचे गुरुवारी विमोचन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
रामनगर येथील श्री शक्तिपीठ येथे आयोजित या कार्यक्रमाला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, नचिकेत प्रकाशनचे अनिल सांबरे प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्याच्या बऱ्याच कृतींचा थेट मनाशी संबंध असतो. प्रत्येकाची वेगवेगळी वृत्ती असते व उपजत स्वभाव असतो. आपल्यासोबतचे चांगले मित्र नेहमी आरसा दाखवितात. मात्र मनात अहंकार असला की व्यक्ती मित्रांचेही ऐकत नाही. यातून ‘मी’पणा वाढतो व तो घातक ठरू शकतो, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले.
आयुष्यात वावरत असताना नमते नेमके कुणी घ्यावे, या मुद्यावरून अनेकदा वाद होतात. मीच का नमते घ्यावे, असा प्रश्न विचारला जातो आणि यातूनच ‘ब्रेकअप’ होताना दिसतात. अगोदर एकत्र कुटुंबपद्धती होती व त्यात एकमेकांशी जुळवून घेण्याची सवय लहानपणापासूनच होती.
मात्र आताच्या व्यवस्थेत अहंकार योग्य वेळी आवरता कसा घ्यावा, याची सवयच राहिलेली नाही. यापासून सुटका हवी असेल तर आत्मियतेचा परीघ वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या देशाचा ‘हॅपीनेस इन्डेक्स’ सातत्याने घसरतो आहे. आपण वेगळ्याच तणावाखाली वावरतो आहे.
दुसरीकडे पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात आपल्या संस्कृतीचा विसर पडतो आहे. अशास्थितीत मानसोपचार तज्ज्ञांनी समाजप्रबोधन करावे, असे डॉ. शेंबेकर यांनी सांगितले. यावेळी लेखिका डॉ. पल्लवी जोशी-गायकवाड यांनीदेखील मनोगत मांडले. शिल्पा नंदनपवार यांनी संचालन केले.

Web Title: Comprehensive study of Indian psychology; Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.