फितूर हेडकॉन्स्टेबलला सक्तीची सेवानिवृत्ती
By admin | Published: May 8, 2015 02:09 AM2015-05-08T02:09:49+5:302015-05-08T02:09:49+5:30
बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांड खटल्यातील फितूर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हेडकॉन्स्टेबल दीपक त्रिवेदी यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली आहे.
नागपूर : बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांड खटल्यातील फितूर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हेडकॉन्स्टेबल दीपक त्रिवेदी यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली आहे. राज्य शासनाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.
१८ एप्रिल रोजी हत्याकांडातील अपीलांवर सुनावणी करताना त्रिवेदी यांच्या फितुरीचा मुद्दा उपस्थित झाला होता. यानंतर न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी त्रिवेदींना कारणे दाखवा नोटीस जारी करून २१ एप्रिल रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्रिवेदी यांनी न्यायालयात उपस्थित होऊन स्पष्टीकरण सादर करण्यासाठी वेळ घेतला होता. दरम्यान, गेल्या तारखेला न्यायालयाने कडक भूमिका घेताना त्रिवेदी यांच्यावर कोणती कारवाई केली अशी विचारणा शासनास करून उत्तर मागितले होते. परिणामी शासनाने त्रिवेदी यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्याची कारवाई केली आहे. न्यायालयाचे यावरही समाधान झाले नसून ‘पर्ज्युरी’च्या कारवाईवर सुनावणी घेण्यासाठी प्रकरण १६ जून रोजी ठेवण्यात आले आहे.
सत्र न्यायालयाने या हत्याकांडातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, सात आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली आहे.
उच्च न्यायालयाने शासनाच्या व आरोपींच्या अपीलांवरील निर्णय राखून ठेवला आहे. त्रिवेदी यांच्यातर्फे अॅड. संदीप चोपडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)