संगणक परिचालकांना चार वर्षांपासून मानधनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:45+5:302021-07-04T04:06:45+5:30
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात ‘आपले सेवा केंद्र’ चालविणाऱ्या १४ संगणक परिचालकांचे तीन महिन्याचे मानधन गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहे. ...
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात ‘आपले सेवा केंद्र’ चालविणाऱ्या १४ संगणक परिचालकांचे तीन महिन्याचे मानधन गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहे. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. त्यामुळे थकीत मानधन मिळणार कधी, असा सवाल या संगणक परिचालकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत पंचायत विस्तार अधिकारी यशवंत लिखार यांना निवेदन देण्यात आले आहे.
गावातील नागरिकांची कामे गावात व्हावी. शासकीय कामे डिजिटल करण्याच्या उद्देशाने शासनाने प्रत्येक गाव संगणकीकृत केले. त्यामुळे गावातील कामे गावात होण्यास सुरुवात झाली. नागरिकांचा त्रास वाचावा म्हणून ही सर्व व्यवस्था करण्यात आली. या ‘आपले सेवा केंद्रा’वर काम करण्यासाठी संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली. जीवावर उदार होत या संगणक परिचालकांनी कोरोनासारख्या कठीण काळातही कर्तव्य बजावले. परंतु आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
२०१७ मधील एप्रिल,मे,जून अशा तीन महिन्याचे मानधन गेल्या चार वर्षापासून अदा करण्यात आलेले नाही. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे आरटीजीएस सीएससी कंपनीच्या अॅक्सिस बँक, नेहरू प्लेस, दिल्ली येथील खात्यात जमा करूनदेखील केंद्रचालकाचे मानधन अद्याप जमा करण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील १४ केंद्र चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अनेकदा संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर पुढील मानधनात देण्यात येईल, अशी बतावणी करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील पंधरवड्यात थकीत मानधन मिळाले नाही तर काम बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या तालुका अध्यक्षा मेघा भिंगारे, उपाध्यक्ष अंकुश तभाणे, सचिव देवेंद्र वांढरे यांच्यासह सर्व केंद्र चालकांच्या वतीने देण्यात आला आहे.
- विस्तार अधिकारी यशवंत लिखार यांना निवेदन देताना संगणक परिचालक.