नागपुरात ब्रॉड गेज मेट्रोची संकल्पना राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:10 AM2020-08-07T11:10:43+5:302020-08-07T11:11:03+5:30
पॅसेंजर आणि एक्स्प्रेससाठी ब्रॉडगेज मेट्रो हा योग्य पर्याय होऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रॉड गेज मेट्रोची संकल्पना नागपुरात राबविण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी इलेक्ट्रिफिकेशन तयार आहे, रेल्वे रुळही आहेत, स्टेशनही तयार आहे. एक्स्प्रेस ६० किमी प्रतितास वेगाने धावते, पॅसेंजर ४० किमी प्रतितास वेगाने धावते, तर ब्रॉडगेज मेट्रो १२० किमी प्रतितास वेगाने धावणार आहे. पॅसेंजर आणि एक्स्प्रेससाठी ब्रॉडगेज मेट्रो हा योग्य पर्याय होऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
'इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स'तर्फे आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, १८ टक्के कॉर्बन डायऑक्साईड राष्ट्रीय महामार्गांवर चालणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होतो. हे प्रमाण भविष्यात वाढू नये यासाठी जैविक इंधन किंवा विजेवर चालणारी वाहने यांचा वापर वाढला पाहिजे. हीच काळाची गरज आहे, महानगरांमधील सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक बसेस किंवा सीएनजी, एलएनजी इंधनाचा वापर झाला पाहिजे. मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, बंगलोर-चेन्नई, दिल्ली-जयपूर अशा वाहतुकीसाठी डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा वापर व्हावा. यामुळे इंधनाच्या खर्चात प्रचंड बचत होईल.