बीव्हीजीने रुजविली सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना : हनमंतराव गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:15 AM2019-01-06T01:15:27+5:302019-01-06T01:20:50+5:30
व्यवसाय करताना नफा पोटापुरता मर्यादित ठेवला, तर व्यवसायाच्या भरभराटीला वेळ लागत नाही. भारत विकास प्रतिष्ठान (बीव्हीजी) ही कंपनी नसून एक चळवळ आहे. जिने सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना या देशात राबविली आहे. त्यामुळे बीव्हीजी आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्याच्या अडचणी सोडवित आहे, असे मत बीव्हीजीचे संस्थापक हनमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यवसाय करताना नफा पोटापुरता मर्यादित ठेवला, तर व्यवसायाच्या भरभराटीला वेळ लागत नाही. भारत विकास प्रतिष्ठान (बीव्हीजी) ही कंपनी नसून एक चळवळ आहे. जिने सोशल एन्टरप्रायजेसची संकल्पना या देशात राबविली आहे. त्यामुळे बीव्हीजी आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्याच्या अडचणी सोडवित आहे, असे मत बीव्हीजीचे संस्थापक हनमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
१६ व्या जागतिक मराठी संमेलनात हनमंतराव गायकवाड यांची प्रकट मुलाखत शनिवारी झाली. संपादक गजानन निमदेव व सचिन इटकर यांनी गायकवाड यांना विविध विषयांवर बोलते केले. रेहमतपूर ते लंडन व्हाया पुणे असा प्रवास कसा झाला, या प्रश्नावर उत्तर देताना गायकवाड म्हणाले, परिस्थिती हलाखीची होती. हुशार असल्यामुळे आईवडील साताऱ्याला घेऊन आले. त्यांचे कष्ट डोळ्यापुढे होते. वयाच्या १४ व्या वर्षी संकल्प केला. १८ व्या वर्षी प्रतिष्ठानची स्थापना केली. टेल्को कंपनीत कार्यरत असताना, स्वत:साठी काम करण्याचा निर्धार केला. ८ लोकांपासून सुरू झालेल्या बीव्हीजीत आज देशभरातील ८० हजार तरुण तरुणी कार्यरत आहे. हे सर्व सहज शक्य झाले नाही. त्यासाठी झुंजावे लागले आणि झुंजत पुढे जावे लागले.
बेरोजगारीच्या प्रश्नासोबतच बीव्हीजीने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्य सुरू केले आहे. विषमुक्त शेती आणि विकसित भारत या संकल्पनेवर कार्यरत बीव्हीजीने एका वर्षात ३० हजार शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून शेतीचा खर्च कमी केला आहे. येणाऱ्या काही वर्षात १० कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तनाचा ध्यास बीव्हीजीने घेतला आहे.
आरोग्याच्या क्षेत्रात बीव्हीजीने सुरू केलेल्या आपात्कालीन सेवेचा १०८ क्रमांक प्रत्येकाचा तोंडपाठ आहे. ३५ लाख लोकांना त्याचा लाभ झाला आहे. ३० हजार बाळ १०८ अॅम्ब्युलन्समध्ये जन्माला आले आहे. मुंबईत सुरू केलेली बाईक अॅम्ब्युलन्सही वेगाने सेवा देत आहे. २० हजार लोकांना बाईक अॅम्ब्युलन्सने मदत केली आहे.
जयपूरला आणले टॉप १० मध्ये
जयपूरच्या चौकाचौकात कचऱ्याचे ढिगारे पडून असायचे. ४० लाख लोकसंख्येच्या या शहराच्या स्वच्छतेचे काम बीव्हीजीला मिळाले. आज स्वच्छ सर्वेक्षणात हे शहर २४० वरून टॉप १० मध्ये आले.
संधी भरपूर आहे
तरुणाईने आपल्याला काय जमते याचा शोध घेतला पाहिजे. चांगल्या कल्पना निवडल्या पाहिजे. सोबतच चांगले साथीदार शोधले पाहिजे. जग हे मार्केट झाले आहे. तरुणाईने ज्ञान व आत्मविश्वास वाढविण्यास भरपूर संधी असल्याचे गायकवाड म्हणाले.